जे चोर असतात तेच ‘चौकीदार चोर’ असल्याची बोंब मारतात : अमित शाह

राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना काय आधार होता? याचे उत्तर राहुल गांधींनी द्यावे. त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून एवढे मोठे आरोप केले. राहुल गांधींकडून देशासह सैन्याचीही दिशाभूल झाली असल्याचा आरोप शाह यांनी केला.

 

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी केवळ स्वतःच्या आणि पक्षाच्या फायद्यासाठी राफेल व्यवहारावर आरोप केले होते. आज सुप्रीम कोर्टाने यात घोटाळाच झाला नसल्याचे सांगत राहुल गांधींना चपराक लगावली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशाची आणि सैन्याची माफी मागावी, असे वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केले.

राफेल घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत शाह यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. हा निकाल म्हणजे राहुल गांधींना चपराक असून  हा सत्याचा विजय असल्याचे शाह म्हणाले. सुप्रीम कोर्टाने अप्रत्यक्षरीत्या कराराला योग्य ठरवलं असून आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी, असे शाह म्हणाले.

काँग्रेस पक्ष एक काल्पनिक जगात जगणारा पक्ष
काँग्रेस पक्ष एक काल्पनिक जगात जगणारा पक्ष आहे.  ज्यामध्ये सत्य आणि न्यायाला जागाच नाही. प्रश्न काँग्रेस पक्ष निर्माण करणार, वकीलही तेच आणि न्यायाधीश देखील तेच आहेत. आज काँग्रेस देशाच्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा करत अविश्वास दाखवत आहे, अशी टीकाही शाह यांनी केली.

शाह म्हणाले की, राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना काय आधार होता? याचे उत्तर राहुल गांधींनी द्यावे.  त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून एवढे मोठे आरोप केले. राहुल गांधींकडून देशासह सैन्याचीही दिशाभूल झाली असल्याचा आरोप शाह यांनी केला. मोदी सरकारने पारदर्शीपणे कारभार केला आहे. घोटाळे करणाऱ्या काँग्रेसने आरोप करण्याआधी स्वतःला तपासावे असेही ते म्हणाले.

जे चोर असतात तेच चौकीदार चोर असल्याची बोंब मारतात
नरेंद्र मोदींच्या प्रामाणिकतेवर कुणाचीही शंका नाही. चौकीदार चोर नाही, जे चोर असतात तेच चौकीदार चोर असल्याची बोंब मारतात. चौकीदारापासून भीती असल्यानेच चोरीचे आरोप केले जात आहेत. मात्र कितीही आरोप करा सूर्याच्या तेजाला फरक पडत नाही, अशा शब्दात त्यांनी मोदींची वाहवाही केली. काँग्रेसच्या कार्यकाळात करारात कमिशनखोरांची चांदी होती, असा आरोपही त्यांनी केला.

शाह पुढे म्हणाले की, असे बालिश आरोप करणे राहुल गांधींनी टाळावे. काँग्रेसच्या नियमाने देश चालणार नाही. काँग्रेस कोर्टापेक्षा मोठे नाही. जर आरोप लावले तर तथ्य सुप्रीम कोर्टासमोर का ठेवले नाही?  असा सवाल करत सगळे तथ्य घेऊन सदनात चर्चा करा, असे आव्हान देखील त्यांनी केले. आधारहीन आरोप लावणे चुकीचे असून राहुल गांधींनी स्वतःची विश्वसनीयता जपावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत