जे.जे.उड्डाणपूलावर स्टंट करताना दोन बाईकस्वारांचा मृत्यू!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

जे.जे.उड्डाणपूलावर वेगात बाईक चालवण्याचा स्टंट करताना भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास जे.जे.उड्डाण पूलावरुन दोन बाईक प्रचंड वेगात दक्षिण मुंबईच्या दिशेने चालल्या होत्या. एकूण चार जण या बाईकवर होते. त्यावेळी एका बाईकस्वाराचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि बाईक रस्ता दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या गाडीवर आदळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आणि दुसऱ्याचा जे.जे.रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

बाईकस्वार प्रचंड वेगात असताना एका वळणावर बाईकस्वाराचे नियंत्रण सुटले आणि बाईक रस्ता दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या स्कोडा कारवर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती कि, बाईक काही सेकंदांसाठी हवेत उडाली असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अपघाताच्यावेळी बाईकस्वाराने आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले नव्हते असे पोलिसांनी सांगितले.

हा अपघात मागून येणाऱ्या दुसऱ्या बाईकस्वाराने पाहिला व त्याने वेगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांची बाईक घसरली व एकजण जखमी झाला असे पोलिसांनी सांगितले. या अपघातातून बचावलेल्या दोघांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. या अपघातात स्कोडा कारचा चालक व प्रवाशांना कुठलीही दुखापत झालेली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत