ज्येष्ठ पत्रकार, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे बुधवारी रात्री दिल्लीत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. आणीबाणीच्या काळात नय्यर हे तुरुंगातही गेले होते.

दिल्ली : रायगड माझा वृत्त 

ज्येष्ठ पत्रकार, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचे बुधवारी रात्री दिल्लीत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. आणीबाणीच्या काळात नय्यर हे तुरुंगातही गेले होते. नय्यर यांना २०१५ मध्ये रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. देशातील विविध वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केले होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

कुलदीप नय्यर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ मध्ये पाकिस्तानच्या सियालकोट भागात झाला होता. ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे संपादकपद भूषविलेले नय्यर पत्रकारितेच्या आणीबाणीविरोधातील लढाईचे प्रतीक बनले होते. त्यावेळच्या सरकारी हस्तक्षेपाविरोधात निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या नय्यर यांना अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात टाकण्यात आले होते.

पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात कुलदीप नय्यर हे उर्दू वर्तमानपत्रासाठी काम करायचे. दिल्लीतील ‘द स्टेट्समन’ या वृत्तपत्राचे ते संपादक होते. मानवाधिकार कार्यकर्ते आणि शांततेसाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जायचे. १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्रात गेलेल्या भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे ते सदस्य होते. ऑगस्ट १९९७ ते राज्यसभेत खासदार म्हणून गेले होते. १९९० मध्ये ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
इंडियन एक्स्प्रेससह डेक्कन हेराल्ड, द डेली स्टार, द संडे गार्डियन, द न्यू, ट्रिब्यून पाकिस्तान, डॉन पाकिस्तान अशा ८० हून अधिक वृत्तपत्रांसाठी १४ भाषांमध्ये त्यांनी स्तंभलेखन केले होते. इंडिया आफ्टर नेहरु, इमर्जन्सी रिटोल्ड अशी १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत