झटपट श्रीमंत होण्यासाठी छापलं खोटं तिकीट, आरोपी गजाआड

कल्याण : रायगड माझा वृत्त   

आपल्याला लॉटरीचं तिकीट लागलं असं सांगून पेपरमध्ये बातमी छापून आणत सहानभूती मिळवणाऱ्या ‘तो’ भाजी विक्रेता-टेम्पो ड्रायव्हर हा बनाव करत होता हे आता सिद्ध झालं आहे. करोडपती बनण्यासाठी त्यानं खोट तिकीट छापल्याचं आता सिद्ध झालं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

झटपट श्रीमंत होण्यासाठी  कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक भन्नाट प्रकार कल्याण पोलिसांनी अघडकीस आणला आहे. नालासोपारा येथे राहणारा सुहास कदम याने काही दिवसांपूर्वी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात  एका लॉटरी  तिकीट  विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आपल्याला एक कोटी ११ लाख रुपयांची लॉटरी लागली असून, आता मात्र लॉटरी कंपनी हे तिकीट बनावट असल्याचं सांगत असल्यानं लॉटरी विक्रेत्यानेच आपली फसवणूक केल्याचा आरोप सुहासने केला होता.

कल्याण पोलिसांनी त्यानुसार लॉटरी तिकीट विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली. मात्र पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती पुढे आली. तिकीट विक्रेता मात्र  हे तिकीट आपण विकलेलंच नाही, असं पोलिसांना सांगत होता, त्यामुळं पोलिसांनी लॉटरी कंपनीकडेही चौकशी केली. मात्र हे तिकीट खोटं असल्यानं लॉटरी कंपनीनेही सांगितलं.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, सुहासच्या दाव्यानूसार त्याने  १६ मार्च २०१८ रोजी कल्याणच्या प्रिन्स लॉटरी सेंटरमधून हे तिकीट खरेदी केल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे पोलिसांनी १६ मार्च रोजीचं सुहासचं मोबाईल फोनचे लोकेशन तपासलं असता तो  संपूर्ण मार्च आणि एप्रिल महिन्यात एकदाही कल्याणला आला  नसल्याचं उघड झालं.

पोलिसांनी सुहासला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. सुहासकडे असलेलं हे तिकीट त्याचा मेव्हणा अरुण गावडे आणि मंगेश गावडे यांनी सावंतवाडी येथे स्वतः तयार केलं होतं. लॉटरीची सोडत जाहीर झाल्यावर त्यातला १ कोटीची लॉटरी लागलेल्या तिकिटाचा क्रमांक आणि कल्याणच्या प्रिन्स लॉटरी सेंटरचा खोटा शिक्काही त्यावर मारण्यात आला.

अखेर हा सगळा बनाव उघड झाला आणि सुहास कदम सोबतच त्याचे दोन्ही मेव्हणे आणि अन्य एक साथीदार अजित नाईक अशा चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत