झारखंडमध्ये नमतेपणाची भूमिका घेतल्याचा काँग्रेसला मोठा फायदा

नवी दिल्ली: महाराष्ट्र News 24 वृत्त

सार्वत्रिक निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा पराभव पत्कराव्या लागलेल्या काँग्रेसनं देशभरात आपली ताकद घटल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळंच बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचं व प्रादेशिक पातळीवर कमीपणा घेण्याचं धोरण काँग्रेसनं अवलंबलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला त्याचाच फायदा झाला आहे.

‘मुंगी होऊन साखर खावी…’ अशी एक म्हण आहे. कधीकाळी देशावर एकछत्री अंमल गाजवणाऱ्या व छोट्या पक्षांना कस्पटासमान लेखणाऱ्या काँग्रेसला उशिरा का होईना ही म्हण पटल्याचं दिसत आहे. झारखंडमध्ये काँग्रेसनं घेतलेला नमतेपणा हे त्याचंच उदाहरण असून त्याचा काँग्रेसला मोठा फायदा झाला आहे.

झारखंडमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करणं काँग्रेससाठी अशक्य होतं. अशा परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं तर स्थानिक पक्षांशी आघाडीला पर्याय नव्हता. मात्र, त्यासाठी तडजोड करून कमी जागांवर निवडणूक लढवण्याचा एकमेव पर्याय काँग्रेससमोर होता. हे लक्षात आल्यावर काँग्रेसनं फारशी खळखळ न करता छोट्या भावाची भूमिका स्वीकारली. हेमंत सोरेन यांची खात्री पटावी म्हणून काँग्रेसनं कमी जागा लढण्याचं मान्य केलं. असं असलं तरी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसनं आपल्याला मान्यता द्यावी, असा सोरेन यांचा प्रयत्न होता. झारखंडमधील आदिवासी मतदारांची ताकद जोखून काँग्रेसनं त्यासाठी लगेचच होकार दिला. त्याचाही निवडणुकीत त्यांना फायदा झाला.

अखेर ८१ जागांपैकी काँग्रेसला ३१ व राष्ट्रीय जनता दलाला ७ आणि उर्वरित ४३ जागा झारखंड मुक्ती मोर्चाला असं जागावाटप करण्यात आलं. त्याचा अपेक्षित परिणाम झाला आणि महाराष्ट्रानंतर काँग्रेस झारखंडच्या सत्तेतही परतला. अवघ्या दोन महिन्यात भाजपकडून दोन राज्ये हिसकावून घेतल्यामुळं राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला बळ मिळालं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत