‘झुंड’च्या शूटींगसाठी बिग बी नागपुरात; विमानतळावर चाहत्यांची गर्दी

नागपूर : रायगड माझा वृत्त

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन नागपुरात दाखल झाले आहेत. पुढील काही दिवस या चित्रपटाची शूटिंग नागपुरात होणार आहे. बिग बी चार्टर्ड प्लेनने नागपूर विमानतळावर दाखल झाले आणि त्यानंतर थेट हॉटेलकडे रवाना झाले. बिग बींना पाहण्यासाठी चाहत्यांनी विमानतळावर एकच गर्दी केली.

गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. शूटिंगसाठी सुरुवातीला पुण्यात सेट तयार करण्यात आला होता. पण काही कारणास्तव चित्रीकरण थांबवावं लागलं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी चित्रपटातून काढता पाय घेतल्याची चर्चा होती. निर्मात्यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर बिग बींनी होकार कळवला. या सर्व अडचणींनंतर अखेर ‘झुंड’चं शूटिंग सुरू होणार आहे. नागपुरातील मोहननगर इथल्या सेंट जॉन स्कूलमध्ये सेट उभारण्यात आला आहे.

शूटिंगमुळे बिग बींचा नागपुरात काही दिवस मुक्काम असेल असं म्हटलं जात होतं. पण ताज्या माहितीनुसार, ते शूटिंगच्या वेळापत्रकानुसार विशेष विमानाने नागपुरात येतील आणि काम संपवून पुन्हा मुंबईला परततील. ‘झुंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी एका निवृत्त क्रीडा शिक्षकांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाधीन गेलेल्या एका मुलाचं आयुष्य फुटबॉल या खेळामुळे कसं सुधारतं याविषयीचं कथानक साकारण्यात येणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत