झुणका केंद्राच्या जागेवर धनदांडग्याचे अतिक्रमण

म्हसवड नगरपालिकेची गांधारीची भूमिका : माजी उपनगराध्यक्षांचे निवेदन

म्हसवड: रायगड माझा 

म्हसवड एस.टी. बसस्थानक परिसरात पुर्वी असलेल्या झुणका केंद्राच्या शासनाच्या जागेवर येथील एका धनदांडग्याने अतिक्रमण करुन त्यावर टोलेजंग इमारतीचे बांधकाम सुरु केले आहे. याबाबत पालिका प्रशासनाने गांधारीची भुमिका घेतली असल्याचा आरोप येथील माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र देवबा मासाळ यांनी करीत पालिकेने यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

मासाळ यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगरपालिका नागरिकांतून घरपट्टी वसुल करते. नवीन बांधकामाची नोंद दप्तरी नोंद करुन ज्या बांधकामाची परवानगी नाही, अशांना नोटीस पाठवून पालिकेकडून बांधकाम बंद करते. ज्यांचे बांधकाम पूर्ण आहे त्यांच्याकडून दुप्पट, तिप्पट कर आकारणी करते. मात्र, खुद्द शासकीय जागेत बांधकाम सुरू झाले तरी पालिकेने दुर्लक्ष केले आहे. वास्तविक हे विनापरवाना बांधकाम ज्या ठिकाणी सुरु आहे तेथे महाराष्ट्र शासनाचे झुणका भाकर केंद्र होते. ते बंद झाल्यावर ती शासनाची जागा आजवर रिकामी होती. परंतु, आता त्या जागी बांधकाम सुरू आहे. पालिकेने याकडे त्वरीत लक्ष देवून संबधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी मासाळ यांनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत