टिळा, टोपीवर देश चालणार नाही, राहुल गांधींच्या शिव भक्तीवर नक्वींचा टोला

राहुल गांधींची सध्याची जी कार्यशैली आहे. ती भाजपाची कधीच राहिलेली नाही. मंदिर, मशीद, गुरूद्वारा हे श्रद्धेचे केंद्र असून ते राजकारणाचा केंद्र नाही.

भोपाळ : रायगड माझा वृत्त 

देवदर्शनानंतर भोपाळमध्ये रोड शो करण्यासाठी आलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष रोज नवे-नवे प्रयोग करत आहे. पण यामुळे तेच उघडे पडत आहेत. काँग्रेस अध्यक्ष कधी टिळा लावून घेतील, कधी टोपी घालतील. पण देश टिळा आणि टोपीच्या राजकारणावर चालत नाही, असा टोला नक्वी यांनी राहुल गांधींना लगावला.

धर्म आपल्या ठिकाणी आहे. राहुल गांधींनी त्यांचे धोरण, कार्यक्रम काय आहे, हे सांगायला हवे. तुम्ही कोणत्या नीती आणि कार्यक्रम घेऊन देशातील लोकांमध्ये जात आहात. पण ते सध्या भ्रमित आहेत. राहुल गांधींची सध्याची जी कार्यशैली आहे. ती भाजपाची कधीच राहिलेली नाही. मंदिर, मशीद, गुरूद्वारा हे श्रद्धेचे केंद्र असून ते राजकारणाचा केंद्र नसल्याचे नक्वी यांनी म्हटले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाबाबत नक्वी म्हणाले की, संघात समन्वय आणि संवादाचे संस्कार आहेत. या संवाद आणि संस्कृती संस्कारमुळेच त्यांनी आपल्या मंचावर विविध विचारसरणीच्या लोकांना बोलावले आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनौपचारिक प्रचारासाठी राहुल गांधी हे सोमवारी भोपाळला आले. या दौऱ्यात ते राज्यभरातून आलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते लालघाटी चौकातून बीएचईएल (भेल) दसरा मैदानपर्यंत संकल्प यात्रेत सहभागी होतील. काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून राहुल हे पहिल्यांदाच भोपाळ दौऱ्यावर आले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत