टीम इंडियाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचं निधन

मुंबई : रायगड माझा वृत्त 

भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 77 व्या वर्षी वाडेकरांनी अखेरचा श्वास घेतला.

अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वात भारताने 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.अजित वाडेकर यांच्या पश्चात पत्नी रेखा वाडेकर, दोन मुलं आणि भाऊ असा परिवार आहे. वाडेकरांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवारी) मुंबईत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांचे भाऊ अशोक वाडेकर यांनी दिली. अजित वाडेकर यांची दोन्ही मुलं सध्या परदेशात आहेत. त्यामुळे ती परतल्यानंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

अजित वाडेकर यांचा अल्पपरिचय

अजित वाडेकर यांचा जन्म 1 एप्रिल 1941 रोजी मुंबईत झाला. आपल्या मुलाने गणितात शिक्षण घेऊन, इंजिनिअर व्हावं, अशी अजित वाडेकरांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र अजित वाडेकरांनी क्रिकेट हेच आपलं करिअर निवडलं.

क्रिकेट कारकीर्द

1958 साली त्यांनी फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये आगमन केलं, त्यानंतर 1966 साली त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी खेळायला सुरुवात केली. 1966 ते 1974 या काळात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळले.

13 डिसेंबर 1966 रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीतून त्यांनी पदार्पण केलं होतं. या पहिल्या सामन्यात त्यांनी आठ धावा केल्या होत्या. तेव्हाच्या वेस्ट इंडिज संघासमोर भारताचा या सामन्यात सहा विकेट्सने पराभव झाला होता.

अजित वाडेकर यांनी 37 कसोटी सामन्यांमधील 71 डावांमध्ये 2113 धावा केल्या. 143 ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे. या धावांमध्ये एक शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. तर दोन वन डे सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर 73 धावा असून 67 ही सर्वोच्च खेळी आहे.

‘आक्रमक फलंदाज’ म्हणून वाडेकरांची ओळख होती. अजित वाडेकर त्यांच्या कारकीर्दीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरत. ‘सर्वोत्कृष्ट स्लिप फिल्डर’ म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.परदेशात भारताला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारे कर्णधार म्हणजे अजित वाडेकर. शिवाय भारताचे ते पहिले वन डे कर्णधार होते.

सन्मान

भारत सरकारने अजित वाडेकर यांना 1967 साली क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने अर्थात ‘अर्जुन पुरस्कारा’ने गौरवलं, तर 1972 साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवलं.

सन्मानभारत सरकारने अजित वाडेकर यांना 1967 साली क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने अर्थात ‘अर्जुन पुरस्कारा’ने गौरवलं, तर 1972 साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत