टीव्ही चॅनलवरून कर्मचाऱ्यांत हाणामारी

अंबरनाथ : रायगड माझा वृत्त 

Image result for हाणामारी

शहरातील आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असलेल्या अंबरनाथ अग्निशमन दलाचे कर्मचारी सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. अग्निशमन दलाच्या कार्यालयात ठेवलेल्या टीव्हीवरील कार्यक्रम पाहताना चॅनेल बदलल्याच्या रागातून दोन कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या मागील प्रवेशद्वाराजवळ अंबरनाथचे अग्निशमन दलाचे कार्यालय आहे. कर्मचाऱ्यांना विरंगुळा म्हणून येथे एक टीव्ही लावण्यात आला आहे. त्यामुळे काम नसताना कर्मचारी टीव्ही पाहत असतात. बुधवारी रात्री अग्निशमन दलाचे कर्मचारी टीव्ही पाहत असताना यातील प्रकाश कराड हा कर्मचारी टीव्हीवर मालिका बघत होता. यावेळी किशोर भोर याने क्रिकेट मॅच पाहण्यासाठी बदलला. चॅनल बदलल्यावरून दोघांमध्ये सुरू झालेल्या वादावादीचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. अखेर इतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी या भांडणात मध्यस्थी करत ही हाणामारी सोडवली. या प्रकरणी प्रकाश अप्पा कराड या कर्मचाऱ्याने किशोर भोर यांच्याविरोधात अंबरनाथ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर या हाणामारीच्या प्रकारानंतर अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने यांनी तेथील टीव्ही काढून टाकला आहे. ही घटना अतिशय निंदनीय आहे. या प्रकरणात दोन्ही कर्मचाऱ्यांवर शिस्त भंगाची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी सांगितले. मात्र अग्निशमन दलाचे कर्मचारी फावल्या वेळेत कार्यालयाच्याच परिसरात अनेकदा जुगार खेळत असल्याची चर्चा असून या वादातूनच ही हाणामारी झाल्याचेही बोलले जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत