रायगड माझा वृत्त
कार्डिफ: इंग्लंड आणि भारतामध्ये खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या टी २० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारतावर ५ गडी राखून विजय मिळवला आहे. आता मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली असून पुढचा सामना मालिकेसाठी निर्णायक असणार आहे.
कार्डिफ शहरातील सोफिया गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय फलंदाजांना काही विशेष कामगिरी करता आली नाही. दुसऱ्याच षटकांत रोहित शर्माने हवेत मारलेल्या चेंडुचा जॉस बटलरने झेल घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तर शिखर धवनला जेसन रॉयने रन आऊट केलं. पहिल्या टी२० सामन्यात शतकी खेळी करणारा के. एल राहुलही या सामन्यात फक्त ६ धावा करुन बाद झाला. त्यातल्या त्यात विराटने ४७ धावांची आश्वासक खेळी केली. इंग्लंडच्या जेस बॉल,प्लंकेट,वाईली आणि आदिल रशीद या गोलंदाजांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. २० षटकांअखेर भारताने ५ बाद १४८ धावा करत इंग्लंडसमोर १४९ धावांचं लक्ष्य ठेवलं.