ठाण्यातील खंडणी प्रकरणात छोटा शकीलही आरोपी

ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी कुप्रसिद्ध माफिया दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला अटक करण्यात आली असतानाच आता त्यापाठोपाठ दाऊदचा विश्वासू साथीदार छोटा शकील याचे नाव या प्रकरणात पुढे आल्याने पोलिसांनी त्यालाही आरोपी केले आहे. तसेच इकबालसाठी खंडणी वसूल करणाऱ्या गुंडांना बोरिवली भागातील एक व्यक्ती आर्थिक पुरवठा करीत असल्याचे तपासात समोर आले असून या व्यक्तीसह टोळीतील गुंडांचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या इकबाल कासकर याच्यासह मुमताज व इसरार अली अशा तिघांची ठाणे खंडणीविरोधी पथक चौकशी करीत आहेत. त्यामध्ये या खंडणी प्रकरणात दाऊदचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. असे असतानाच दाऊदचा विश्वासू साथीदार छोटा शकील याचे नाव या खंडणी प्रकरणात समोर आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.

बोरिवलीमधील ती व्यक्ती कोण ?

इकबाल कासकर आणि अन्य दोन साथीदारांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी त्यांना ठाण्याचे न्यायाधीश आर.टी. इंगळे यांच्यासमोर हजर करण्यात आले. बोरिवलीतील ती व्यक्ती आणि बिहारच्या त्या दोन गुंडांची माहिती मिळविण्यासाठी या तिघांच्या कोठडीची मुदत वाढवून देण्याची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली. ही मागणी मान्य करीत ठाणे न्यायाधीश इंगळे यांनी तिघांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत