ठाण्यात फिरतोय शीर नसलेला माणूस! का ते वाचा…

( रायगड माझा ऑनलाईन )

Image may contain: 1 person, standing and outdoorठाणे : वाहतूक पोलीस नेहमीच अगदी तळमळीने नागरिकांना हेल्मेट घाला असं सांगत असतात. पण सहसा हे कोणी ऐकताना आढळत नाही. प्रत्येकाला हेल्मेट न घालता त्यांची दुचाकी चालवण्यात एक वेगळीच मजा अनुभवायची असते. मात्र याच मजेपायी अनेकांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी आता जनजागृतीसाठी एक अफलातून शक्कल लढवली आहे. या पोलिसांसोबत सिग्नलवर एक पोलीस मित्र उभा राहतो. या मित्राच्या हातात हेल्मेट आहे, पण ते घालायला शरीरावर शीरच नाही. आहे ना गंमत!…

हेल्मेट हातात ठेवलं तर डोकं धडावर राहणार नाही, हाच महत्वाचा संदेश ठाणे वाहतूक पोलीस ठाणेकरांना एका मजेशीर पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आहे. ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी वाहतूक शाखेमार्फत TAP म्हणजेच Traffic Awareness Program (वाहतूक जनजागृती मोहीम) सुरू केली. त्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी अशाप्रकारे एका वेगळ्या वेशभूषेतील मित्राची मदत घेतली आहे. प्रत्येक वेळी तो हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वाराला सांगतो की, जर हेल्मट डोक्यावर नाही घातलं तर त्याच्यासारखी अवस्था होईल. तेव्हा नियम पाळा ते तुमच्यासाठीच आहेत. आणि त्याचबरोबर भेट म्हणून TAP चा लोगो असलेली आणि ‘हेल्मेट घाला’ चा नियम असलेली एक की-चेन भेट दिली जाते. बुधवारी ठाणे वाहतूक पोलीस तीन हात नाका आणि कॅडबरीजंक्शन या दोन ठिकाणी ही मजेशीर कारवाई करत होते.

TAP ही मोहीम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली ते ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे म्हणाले, ‘नागरिकांनी वाहतूक नियमांचे नीट पालन करावे यासाठी ठाणे पोलीस नेहमीच सतर्क असते आणि गेल्या चार महिन्यांपासून शाळा कॉलेज आणि मॉलमध्ये अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील ३ महिन्यात आम्ही एकूण ३९८५ विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई केल्या आहेत. आज आपण पहिले तर अपघातामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण जास्त आहे आणि त्यात हेल्मेट न घातलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. बरेच दुचाकीस्वार दंड लागू नये यासाठी हेल्मेट सोबत घेतात गाडीला अडकवून ठेवतात आणि पोलीस दिसल्यानंतर घालतात. अपघात होताना जर हेल्मेट घालेपर्यंत वेळ मिळाला नाही तर त्याला आपला जीव गमवावा लागेल म्हणून आम्ही जनतेला सांगू इच्छितो कि हेल्मेट हे तुमच्या सुरक्षेसाठी घाला पोलिसांसाठी नव्हे.’

ठाण्यात दरवर्षी विना हेल्मेट ११,०१९ दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाही केल्या गेल्या आहेत व ५०,३१,६०० एवढी रक्कम दंड स्वरूपात आकारण्यात अली आहे.
नियम हे पाळण्यासाठी असतात तोडण्यासाठी नाही, पण कोणीही ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. आणि जेव्हा पोलीस हेच नियम सांगण्यासाठी कडक कारवाई करतात तेव्हा मात्र पोलिसांना विनाकारण नागरिकांनाचा रोष पत्करावा लागतो. हे लक्षात घेऊन ही शक्कल पोलिसांनी लढवली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत