ठाण्यात बनावट स्टॅम्प बनविणारी टोळी जेरबंद; दहा जणांना अटक

बनावट स्टॅम्प बनवून कोट्यवधीचा महसूल बुडवणारी टोळी जेरबंद

ठाणे : रायगड माझा वृत्त

ठाणे पोलिसांनी धडक कारवाई करत सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडविणासाठी कारणीभूत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी टोळीतील सदस्यांकडून एक कोटी 28 लाख रुपयांची 156 बनावट पावती पुस्तकं, तसंच लॅपटॉप, मोबाईल, पेन ड्राईव्हही जप्त करण्यात आले आहेत. महसूल खात्याचे बनावट सरकारी स्टॅम्प बनवून, पावती बुक छापून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीतील एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी तीन ते चार महिन्यांपासून हे काम करत होती. परिणामी सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडाला होता.

ही टोळी कळवा परिसराच्या आजूबाजूला कार्यरत होती. टोळीतील एक सदस्य 11 जुलै रोजी कळवा रेती वाहतूक परवान्याची बनावट पावती पुस्तक घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर ठाण्याचे तहसीलदार मुकेश पाटील यांना घेऊन ठाणे पोलिसांनी संबंधित जागेवर सापळा रचला. यात विकी विभीषण माळी (वय 25 वर्ष) याला ताब्यात घेतलं. त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडून रेती वाहतूक परवान्याची बनावट पावती पुस्तकं सापडली.

यानंतर तहसीलदार मुकेश पाटील यांनी विकीविरुद्ध कळवा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली असता टोळीतील आणखी नऊ नावं समोर आली. यानंतर कारवाई करत पोलिसांनी या नऊ जणांना अटक केली. अब्दुल समद बहाउद्दीन खान (वय 35 वर्ष), पद्माकर दत्ताराम राणे (वय 29 वर्ष), शाजी वल्लीथ पुन्नन (वय 45 वर्ष), अरविंद सूर्यकांत पेवेकर (वय 30 वर्ष), प्रशांत रघुनाथ म्हात्रे (वय 33 वर्ष), धनसुख उर्फ लकी ईश्वरभाई सुतार (वय 31 वर्ष), उमेश गजोधर यादव (वय 34 वर्ष), राजू माधव पवार (वय 30 वर्ष), रवी वेदप्रकाश जैस्वाल (वय 40 वर्ष) अशी अटक झालेल्यांची नावं आहेत.

दरम्यान, या प्रकरणात आणखी काही आरोपींची नाव निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचं पोलिस उपायुक्त दीपक देवराज म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत