ठेकेदाराचा नाकर्तेपणा उद्यानाच्या मुळाशी

पिंपरी : रायगड माझा 

संत तुकारामनगर येथील स्व. राजेश बहल उद्यानात स्वच्छतागृहासह अनेक सोयी सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हट्‌टाखातर महापालिकेने उद्यान उभारण्याची घाई केली. ठेकेदाराचा नाकर्तेपणा उद्यानाच्या देखभालीस भोवत आहे. मात्र, आवश्‍यक सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याने हे उद्यान असून अडचण आणि नसून खोळंबा ठरत आहे.

या परिसरातील महापालिकेचे हे मोठे उद्यान असल्याने याठिकाणी अबाल-वृध्दांची गर्दी असते. ठेकेदाराकडे उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीचे काम आहे. मात्र, ठेकेदाराकडून कोणतेही काम होत नसल्याची तक्रार याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी केली. उद्यानात बसण्याकरीता पुरेशा खुर्च्या नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते. उद्यानात स्वच्छतागृहाचे काम अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले आहे. उद्यानाला दोन सुरक्षा रक्षक असून एक महिला आणि दोन पुरुष अशी तीन कर्मचारी उद्यानाची स्वच्छता आणि झाडांना पाणी देण्याचे काम करतात.

उद्यानातील झाडांची छाटणी केली नसल्याने झाडे वेडी-वाकडी वाढली आहे. अनेक झाडांच्या फांद्या धोकादायक स्थितीत असून पावसाळा उंबरठ्यावर आल्याने फांद्यांची छाटणी करण्याची मागणी होत आहे. रात्रीच्या वेळी याठिकाणी सुरक्षा रक्षक नसतो. परिणामी उद्यानात रात्री मद्यपींची मैफल जमते. या मद्यपींकडून दारुच्या बाटल्या, खाद्य पदार्थ येथेच टाकून दिले जातात. त्यामुळे उद्यानाच्या अस्वच्छतेत भर पडत आहे.

लहान मुलांच्या खेळण्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या उद्यानात मुलांचे आकर्षण असलेली घसरगुंडी तुटल्याने ती काढुन ठेवली आहे. त्यामुळे बालचमूंचा हिरमोड होत आहे. उद्यानात टवाळखोरांचा मोठ्‌या प्रमाणावर वावर आहे. त्यामुळे महिला वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना आहे. उद्यानासाठी मुबलक पाणी पुरवठा असतानाही झाडांपर्यंत पुरेसे पाणी पोहचत नाही. परिणामी उन्हाळ्याचा झाडांना फटका बसल्याचे पहायला मिळत आहे. महापालिका उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वर्षाकाठी लाखो रुपये खर्च करते. मात्र, कोणतीही कामे उद्यानात झाली नाहीत. उलट उद्यानाची दूरवस्था वाढत चालली आहे. उद्यान विभागाचा ठेकेदारावर वचक राहिलेला नाही.

उद्यानातील प्रमुख समस्या
– उद्यानातील स्वच्छतागृहाचे काम अर्धवट स्थितीत सोडले
– पावसाळा तोंडावर येवूनही झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी नाही
– उद्यानात बसण्याची पुरेशी व्यवस्था नाही
– रात्री सुरक्षा रक्षकाअभावी मद्यपींचा वावर वाढला
– लहान मुलांच्या खेळण्यांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड
– उद्यानाच्या नियमित स्वच्छतेकडे दुर्लक्ष

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत