डहाणूचे झाले जपान, सात तासांत पाचवेळा भूकंप

पालघर: रायगड माझा वृत्त

गेल्या दोन महिन्यांपासून डहाणूत सुरू असलेला थरथराट अजूनही कायम आहे. आज दिवसभरात सात तासांमध्ये पाचवेळा भूकंप झाल्याने येथील हजारो रहिवासी हादरले आहेत. जपानमध्ये जसे वारंवार भूकंप होतात तसेच भूकंप डहाणूत होऊ लागल्याने स्थानिकांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. कोणत्याही क्षणी काहीही होईल या भीतीने पाचावर धारण बसली आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा 4.8 रिश्टर स्केलचा धक्का आज बसला आणि घरातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी धूम ठोकली. अनेक घरांना तडे गेले. तर जिल्हा परिषदेच्या शाळा सोडण्यात आल्या. भूकंपाचे हादरे तलासरीपर्यंत जाणवल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

डहाणूकरांची आजची सकाळ उगवली तीच भूकंपाच्या हादऱयाने. 6 वाजून 58 मिनिटांनी पहिला धक्का बसला. त्यानंतर सकाळी 10.03 वाजता 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. थोडय़ाच वेळाने 10 वाजून 29 मिनिटांनी पुन्हा 3 रिश्टर स्केलचा हादरा जाणवला. दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनीही 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतरदेखील भूकंपाचे धक्के जाणवले. धुंदलवाडी, चिंचले, पारडी, हळदपाडा, आंबोली, सासवद येथील घरांना मोठे तडे गेले. अनेकांच्या घरातील भांडीही धक्क्याने खाली पडली. वंकासपाडा, धुंदलवाडी, पळसपाडा, पारडी, आंबोली, सासवद, चिंचर आणि विकासवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा सोडण्यात आल्या. धुंदलवाडीतील वेदांत हॉस्पिटल येथे बसवण्यात आलेल्या भूकंपमापन यंत्रावर आजच्या हादऱयांची नोंद झाली आहे. 11 डिसेंबरपासून आजपर्यंत सतरावेळा भूकंप झाले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू धुंदलवाडी असल्याने स्थानिकांनी घरांना कुलूप लावून दुसरीकडे आसरा घेतला आहे.

विद्यार्थ्यांवर तंबूत झोपण्याची वेळ
सततच्या बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे गेल्या सहा महिन्यांपासून रहिवाशांची झोप उडाली आहे. धुंदलवाडीतील सरकारी आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आश्रमशाळेबाहेर खास तंबू उभारण्यात आला आहे. या तंबूत रोज रात्री थंडीने कुडकुडत झोपण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली असून अनेक पालकांनी आपल्या मुलांना घरी नेले आहे.

डहाणूतील धरणीकंप
दिनांक वेळ तीव्रता
11 नोव्हेंबर 18.25 3.2
24 नोव्हेंबर 15.15 3.3
2 डिसेंबर 1.38 3.1
2 डिसेंबर 1.48 2.9
4 डिसेंबर 21.24 3.2
7 डिसेंबर 22.18 2.9
10 डिसेंबर 9.04 2.8
10 डिसेंबर 9.04 2.7
20 जानेवारी 18.38 3.6
24 जानेवारी 9.12 3.4
24 जानेवारी 9.15 3.4

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत