डॉल्बीच्या वादात आता शिवेंद्रराजेंची उडी; डॉल्बी वापरावर सरसकट बंदी घालू नये!

सातारा : रायगड माझा वृत्त 

साताऱ्यातील गणपती विजर्सन आणि डॉल्बीचा वाद पुन्हा समोर आला आहे. खासदार उदयनराजे यांच्यानंतर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी या वादात उडी घेतली आहे. जिल्हा प्रशासनानं योग्य निर्णय घेऊन तातडीने कृत्रिम तळ्यांची व्यवस्था करावी तसेच डॉल्बीबाबत अटी शिथिल करून डीजेला परवानगी द्यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली आहे.

साताऱ्यात अनेक मंडळांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. मात्र गणपतींचं विसर्जन कुठे करायचं हा प्रश्न या मंडळांसमोर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं गणपती मंडळांना वेठीस न धरता तातडीने निर्णय घेऊन गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

डीजेच्या मुद्द्यावरही शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली. गणपती विसजर्नादरम्यान डॉल्बी वापराला प्रशासनानं काही अटी लावून परवानगी द्यावी, मात्र डॉल्बी वापरावर सरसकट बंदी घालू नये. तसेच नियमाचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करावी, असंही शिवेंद्रराजे भोसले यावेळी म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावणारच : उदयनराजे

कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच आणि सातारा शहरातील गणपतींचं मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार, अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले घेतली आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही साताऱ्याचे उदयनराजे भोसले आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. न्यायालयाचा अवमान झाला तरी त्यासाठी मी समर्थ आहे, मी पळपुटा नाही, कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असंही उदयनराजे म्हणाले.

कोर्टाचा नकार

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापरास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. मात्र साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य आहे? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. सण-उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही असं कोर्टानं म्हटलं आहे. याबाबत पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत