डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्याला सचिन अंदुरेला अटक!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला सीबीआयने अटक केली आहे. नालासोपारा स्फोटकांचा तपास करत असताना तपास पथकाला संशयित शरद कळसकरचा जवळचा मित्र सचिन अंदुरेची माहिती मिळाली. त्या आधारे सचिनला ताब्यात घेण्यात आलं आणि याच प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सचिनकडून डॉ. दाभोलकरांच्या हत्येचे धागेदोरे मिळाले.

सचिन अंदुरेला कशी अटक करण्यात आली?

नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. दाभोलकर प्रकरणाचे धागेदोरे मिळाले होते. शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत. सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली आहे. सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं आहे. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.नालासोपारा स्फोटक प्रकरणात एटीएसच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी (वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसरकर) शरद कळसरकरने डॉ. दाभोलकरांच्या हत्येत सहभागाची कबुली दिली आहे, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली.

जालन्यातूनही एकाला अटक

या प्रकरणात जालना जिल्ह्यातूनही एकाला अटक करण्यात आली आहे. श्रीकांत पांगारकर असं जालन्यात अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

सचिन अंदुरे कोण आहे?

सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता. निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत