ड्रीमगर्लचा भाजपच्या नेत्यांना ‘खो’

2019 मध्ये पुन्हा मथुरेतून लढण्याच्या तयारीला सुरूवात 

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

ड्रीमगर्ल आणि खासदार हेमामालिनी यांनी मथुरेतून लढण्याची तयारी सुरू केल्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांची झोप उडाली आहे. हेमामालिनी यांना मुंबईतून लढण्यास सांगावे, अशी मागणी स्थानिक नेत्यांनी पक्षाकडे रेटून लावली आहे. अशात हेमामालिनी निवडणुकीच्या कामाला लागल्या आहेत.

भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 2014 च्या निवडणुकीत भाजपने हेमामालिनी यांना मथुरेतून उमेदवारी दिल्यामुळे स्थानिक नेत्यांच्या स्वप्नांवर विरजण पडले होते. अख्ख आयुष्य मायानगरीत घालविल्यामुळे हेमामालिनी यांचे मथुरेत मन लागणार नाही, असे स्थानिक नेत्यांना वाटत होते. शिवाय, हेमामालिनी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांना भेटत नाहीत अशा तक्रारी सुध्दा येत होत्या. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हायकमांडकडे तक्रारी सुध्दा केल्या आहेत.

 

यामुळे भाजप मथुरेतून एखाद्या स्थानिक नेत्याला तिकीट देईल, असे स्थानिक नेत्यांना वाटू लागले होते. परंतु, हेमामालिनी यांनी 2019 च्या निवडणुकीच्या कामाला लागल्यामुळे खासदार होण्याचे स्वप्न पाहणा-या स्थानिक नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्या पब्लिक मिटींग करू लागल्या आहेत. पक्षाने आपल्याला मथुरेतून नाही उतरविले तर आपण मुंबईला परत जावू. अर्थात, मथुरेशिवाय आपण कुठूनही लढणार नाही, असा स्पष्ट इशारा हेमामालिनी यांनी दिला आहे.

उत्तरप्रदेशचे उर्जा मंत्री श्रीकांत शर्मा यांना मथुरेतून उमेदवारी दिली जावू शकते, अशी चर्चा आहे. शिवाय तीन वेळा खासदार राहिलेले तेजवीर सिंग हेही तयारी करीत आहेत. मात्र, हेमामालिनी यांनी 2014 मध्ये जयंत चौधरी यांचा साडे तीन लाखाच्या फरकाने पराभव केला होता. यामुळे त्यांचे तिकीट कापने कठीण असल्याची चर्चा आहे.

हेमामालिनी यांनी वृंदावन ओमेक्‍स सिटी येथे घर खरेदी केले आहे. गृहप्रवेश करताना पती धर्मेंद्र सोबत होते. आता मुंबईहून आल्यानंतर हेमामालिनी हॉटेल अशोकामध्ये थांबण्यापेक्षा ओमेक्‍स सिटीत राहणे पसंत करतात. लोकांशी चर्चा करतात. मथुरेत आपण बरेच काम केले आहे आणि त्यातील काही अपूर्ण कामे पूर्ण करायची आहेत, असे हेमामालिनी यांनी पक्षाला सांगितले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.