तटकरेंना त्यांच्याच खेळीने गितेंचे उत्तर

चिपळूण : रायगड माझा वृत्त

रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची भेट घेऊन शिवसेनेला डिवचले होते.

आता त्यांचे प्रतिस्पर्धी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नविद अंतुले यांची भेट घेऊन ‘राष्ट्रवादी’ला प्रत्युत्तर दिले. या भेटीतून गितेंनी तटकरेंच्याच खेळीने उत्तर दिल्याने लोकसभा निवडणुकीत गिते आणि तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष आता सुरू झाला आहे.

रायगडात शिवसेनेतर्फे गिते उमेदवार असतील, हे शिवसेनेकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. ‘राष्ट्रवादी’कडून तटकरे यांना संधी मिळणार, हे निश्‍चित होते. संभाव्य उमेदवारी लक्षात घेऊन तटकरे आणि गिते एकमेकांवर टीकाटिप्पणी करायचे. मात्र, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीही रायगडमधून उमेदवारी मागितल्याने ‘राष्ट्रवादी’त रायगडच्या उमेदवारीवरून गुंता होता. पक्षाने तटकरे यांचे नाव निश्‍चित केल्यानंतर त्यांनी प्रथम रत्नागिरी जिल्ह्यात ‘एंट्री’ करून दळवी यांची भेट घेतली.

बॅ. ए. आर. अंतुले यांच्याशी माझे जवळचे संबंध होते. यासाठी आपण त्यांचे पुत्र नविद यांची भेट घेतली. २०१९ मध्ये निवडून येण्यासाठी मला म्हसळासह रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते सहकार्य करतील.
– अनंत गिते, 

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री

दळवी हे शिवसेनेत नाराज आहेत. वारंवार त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. तटकरेंनी दळवींची भेट घेऊन शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. गिते यांनी अंतुलेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अंतुलेंच्या आंबेत गावच्या ग्रामपंचायतीत काँग्रेस आणि शिवसेनेची युती आहे. नविद हे रायगडात सक्रिय झाले आहेत. ते तटकरेविरोधी भूमिका वारंवार मांडत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत