तपासयंत्रणेवर भाजपचं नियंत्रण : पवार

पुणे : रायगड माझा वृत्त

केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) प्रमुख अधिकाऱ्याला घरी पाठवून त्यांच्या जागी चौकशांच्या फेऱ्यातील व्यक्तीची नेमणूक करून भारतीय जनता पक्ष तपासयंत्रणाही आपल्या मुठीत ठेवत असल्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात लक्ष वेधले. शबरीमला मंदिराबाबत न्यायालयाचा निर्णयही भाजप अध्यक्षांना मान्य नाही. संविधान आणि न्यायव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या राज्यकर्त्यांच्या हातातून सत्ता हिसकावून घ्यावी लागेल, असे सांगून पवार यांनी भाजप सरकारच्या अकार्यक्षमतेवर चौफेर टीका केली.

केंद्र सरकार संविधानावर आघात करीत असल्याचा आरोप करीत, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे राबविण्यात येत असलेल्या “संविधान बचाओ, देश बचाओ’ मोहिमेतर्गंत पश्‍चिम महाराष्ट्रातील मेळावा झाला. त्या वेळी पवार बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, खासदार वंदना चव्हाण, विद्या चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते. राज्यातील दुष्काळी स्थितीची प्रचंड झळ महिलांना बसत आहे. मात्र, त्यावर उपाययोजना करण्याची सरकारची तयारी नसल्याचे स्पष्ट करीत, अशा परिस्थितीत सामान्य नागरिक, शेतकरी आणि अन्य घटकांना दिलासा देण्यात राज्य सरकार कमी पडल्याचा ठपकाही पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवला.

पवार म्हणाले, “शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला भाजपचे अध्यक्ष अमित शहा विरोध करीत आहेत. न्यायालयामुळे महिलांना त्यांचा अधिकार मिळत असतानाही ही मंडळी हस्तक्षेप करीत आहेत. घटना आणि न्यायव्यवस्थाही ताब्यात ठेवणाऱ्या या राज्यकर्त्यांचा प्रयत्न घातक आहे. मात्र, याच लोकांसाठी सत्ता आहे. परंतु, त्यांच्या या हालचालींकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. दुष्काळात जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यासह काही करण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करीत नाहीत. ” दरम्यान, “ईव्हीएम’ आणि मनुस्मृतीच्या प्रतीचे या वेळी दहन करण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत