…तरीही 48 मतदारसंघात भाजपची तयारी : दानवे

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त

समविचारी पक्षांनी एकत्र यावे ही जनतेची इच्छा आहे. त्यामुळे युतीसाठी भाजप आग्रही आहे. तरीही 48 मतदारसंघात भाजपने तयारी केली असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोल्हापूरमध्ये सांगितले.

अमित शहा यांच्या शिवसेनेबाबतच्या वक्तव्यावर बोलताना अमित शहा एका पक्षावर बोलत नव्हते असा खुलासा श्री. दानवे यांनी केला. लोकसभेबाबत प्रश्नांचा भडिमार सुरू झाल्यानंतर दानवे यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

श्री दानवे म्हणाले, सध्या लोकसभेच्या ४८ पैकी ३६ मतदारसंघांचा दौरा पूर्ण झाला आहे. निवडणुकीस वातावरण अत्यंत चांगले आहे. निवडणुकीला सामारे जाताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जी २३ कामे सांगितली आहेत, ती जनतेपर्यंत पोचवा आणि निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी येथे दिला.

लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी सर्किट हाऊस येथे तालुकाध्यक्ष, लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजय पुराणिक, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार सुरेश हाळवणकर, महेश जाधव, बाबा देसाई, मकरंद देशपांडे, संदीप देसाई आदी उपस्थित होते.

दानवे म्हणाले, ‘‘देशात पाच वर्षांत अनेक विकासकामे झाली. मुंबईत कोस्टल रोड, विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. पुण्यात विमानतळ साकारला. आदिवासी, दलितांसाठी धोरणे, अशा योजना मोदी सरकारने आणत क्रांतिकारक बदल केले.’’  ते म्हणाले, ‘‘राज्यात विधानसभेसाठी २८८ विस्तारक, तर लोकसभेसाठी ४८ पूर्णवेळ विस्तारक नेमले आहेत. ते तालुकाध्यक्षांशी चर्चा करीत आहेत.’’

काँग्रेसचे प्रयत्न निष्फळ ठरतील!
काँग्रेसने आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला मोठे होऊ दिले नाही, हा इतिहास आहे. गरीब कुटुंबातील माणूस पंतप्रधान होऊ नये, अशी काँग्रेसची विचारधारा आहे. म्हणूनच भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने आघाडीचे राजकारण सुरू केले आहे; परंतु कितीही आघाड्या केल्या तरी संघटनेच्या बळावर भाजप २०१९ ची निवडणूक जिंकेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असा दावा रावसाहेब दानवे
यांनी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत