तरुणीच्या छातीतून काढली 3.5 सेंटीमीटर लांबीची पिन

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

एका 18 वर्षीय तरुणीच्या फुफ्फुसात 6 दिवस अडकून असलेली पिन आधुनिक ब्रॉन्कोस्कोपने बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. 27 नोव्हेंबरला रूग्ण रूग्णालयात दाखल झाली व त्याच दिवशी ब्राँन्कोस्कोपने पिन बाहेर काढण्यात आली.

इनाया शेख (नाव बदलले आहे) 21 नोव्हेंबर रोजी गोव्यामध्ये होती. स्कार्फ परिधान करत असताना अनवधानाने तोंडात धरलेली पिन तिने चुकून गिळली. तिला लगेचच गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडे नेण्यात आले. पिन नक्की कुठे अडकली आहे, ते शोधण्यासाठी तिच्या छातीचा एक्स-रे काढला. त्यांनी एण्डोस्कोपीने पिन काढण्याचा प्रयत्नही केला पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण, तेथेही पिन काढण्यात यश मिळाले नाही. फुफ्फुसात अडकलेली पिन एण्डोस्कोपी करून काढण्यात 3 वैद्यकीय महाविद्यालये आणि २ हॉस्पिटलमध्ये अपयशच हाती लागले होते. गोव्यातील हॉस्पिटलमधील एका डॉक्टरने शस्त्रक्रिया करून पिन काढण्यास सुचवले, पण तिच्या कुटुंबीयांनी तो सल्ला मानला नाही. पुढील उपचार मुंबईत घेण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतला आणि ते झेन हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. अरविंद काटे म्हणाले, “रुग्ण येथे आली तेव्हा तिच्याकडे एक्स-रे अहवाल होता. फुफ्फुसात अडकलेली पिन धारदार आणि अणकुचीदार होती आणि ती काढली नसती तर हृदय व फुफ्फुसातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचले असते. त्याचप्रमाणे ६ दिवसांपासून ती पिन तिच्या शरीरात असल्याने संसर्ग होण्याचा धोका होता.

“ओपन सर्जरी किंवा छेद देऊन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय अत्यंत गुंतागुंतीचा होता. कारण एण्डोस्कोपी करून पिन काढताना आतील अवयव फाटण्याचा धोका होता”, अशी पुष्टी डॉ. काटे यांनी जोडली. डॉ. काटे पुढे म्हणतात, “फुफ्फुसाचा पापुद्रा फाटण्याची शक्यता असल्यामुळे ब्रॉन्कोस्कोपी करून धारदार पिन बाहेर काढणे कठीण होते. या प्रकरणात फोरसेप्सचा वापर करून लवचिक ब्रॉन्कोस्कोपने ती बाहेर काढली. यासाठी अत्यंत कुशल तज्ज्ञाची आवश्यकता असते. या प्रक्रियेनंतर काढलेला एक्स-रे अहवाल सामान्य होता.

झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. रॉय पाटणकर म्हणतात, “आमची कुशल डॉक्टरांची टीम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अशी गुंतागुंतीची प्रकरणे हाताळता येतात. कोणत्याही प्रकारचा विलंब टाळण्यासाठी आमची कोड ब्ल्यू टीम नेहमी सज्ज असते. अशा प्रकरणांमध्ये दुर्लक्ष केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच पुढील नुकसान टाळण्यासाठी लगेचच वैद्यकीय मदत घ्यावी. इनायाचा भाऊ अल्ताफ शेख म्हणतो, “शस्त्रक्रिया न करताही इनायालची प्रकृती सामान्य झाली आहे. ही आव्हानात्मक केस यशस्वीपणे हाताळून माझ्या बहिणीचा जीव वाचविल्याबद्दल आम्ही झेन हॉस्पिटलच्या टीमचे आभारी आहोत.”

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत