तरुणीला लिफ्ट देणे पडले ‘महागात’

पुणे : रायगड माझा वृत्त 

रस्त्यावरून एखाद्या व्यक्तीला लिफ्ट देणे किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय नारायण पेठेत राहणाऱ्या एका व्यक्तीला आला आहे. लिफ्ट मागणाऱ्या तरुणीला दुचाकीवर बसविल्यानंतर तिने विनयभंग केल्याचा आरोप करून धिंगाणा सुरू केला. त्यानंतर ब्लॅकमेल करून १४ हजार रुपयांची रोकड घेतल्याची घटना साधू वासवानी चौकाजवळ घडली.

याबाबत नारायण पेठेत राहणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार निळी जिन्स आणि गुलाबी टॉप घातलेल्या (वय २७) तरुणीच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. साधू वासवानी चौकाजवळ विजय सेल्स येथे एका तरुणीने त्यांना लिफ्ट मागितली. रात्रीची वेळ असल्याने त्यांनी तिला लिफ्ट दिली. काही अंतर पुढे गेल्यानंतर तिने ‘तुम्ही माझा विनयभंग केला’ असा आरोप करून आरडओरडा सुरू केला. हे प्रकरण इथेच मिटवायचे असेल, तर पैसे द्या अशी मागणी केली. तक्रारदार यांच्याकडे घराचा इएमआय भरण्यासाठी काढून ठेवलेली १४ हजाराची रोख रक्कम होती. ही रक्कम काढून घेऊन ती तरुणी निघून गेली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस अधिक तपास करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत