…तर तरुणांना संधी देऊ, निवड समितीचा ज्येष्ठ खेळाडूंना अल्टिमेटम

 

रायगड माझा वृत्त 

मुंबई : इंग्लंड दौऱ्यात वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या पराभवामुळे भारतीय टीमवर टीकेची झोड उठत आहे. ३ मॅचच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा १-२नं पराभव झाला तर ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १-४नं पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर विराट कोहलीचं कर्णधारपद, रवी शास्त्रीचं प्रशिक्षण, निवड समितीनं निवडलेले खेळाडू आणि खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आता निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही ज्येष्ठ खेळाडूंना इशारा दिला आहे. एवढ्या संधी मिळूनही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही तर नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असं एमएसके प्रसाद म्हणाले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेट आणि भारत ए कडून खेळणाऱ्या खेळाडूंवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं वक्तव्य प्रसाद यांनी केलं आहे. जे खेळाडू चांगली कामगिरी करतायत त्यांना निश्चित संधी दिली जाईल, असं आश्वासन प्रसाद यांनी दिलं.

मयंक अग्रवालला संधी का नाही?

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मयंक अग्रवालनं खोऱ्यानं रन काढल्या आहेत. तरी त्याला अजूनही संधी का देण्यात आली नाही, असा सवाल प्रसाद यांना विचारण्यात आला. तेव्हा आमचं त्याच्याकडेही लक्ष आहे. लवकरच त्याला या कामगिरीचं इनाम मिळेल, असं प्रसाद म्हणाले.

भारतानं या वर्षी परदेशात ६ टेस्ट मॅच गमावल्या आहेत. पण मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मात्र सध्याची भारतीय टीम परदेश दौरा करणारी मागच्या १५-२० वर्षातली सर्वोत्तम टीम वाटत आहे. भारतीय टीम आता डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर असणार नाहीत. त्यामुळे या दौऱ्यामध्ये कोहलीच्या टीमला चांगली कामगिरी करण्याची संधी आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत