…..तर पुन्हा रस्त्यावर उतरू, राजू शेट्टी आक्रमक

पुणे : रायगड माझा वृत्त

‘सरकार व दूध संघाच्या वादात दूध उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या दरातील अनुदानाची दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुपये रक्कम सरकारकडे थकीत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला प्रतिलिटर वीसच रुपये दर मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे. यावर तातडीने तोडगा न काढल्यास रस्त्यावर उतरू,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुधाला वाजवी भाव मिळण्यासाठी संघटनेने जुलैमध्ये आंदोलन केले होते. त्यानंतर गायीच्या दुधाला ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ गुणवत्तेच्या दुधाला प्रतिलीटर २५ रुपये दर सरकारने सर्व संघांशी चर्चा करून निश्चित केला. त्यातील पाच रुपये प्रतिलीटर अनुदान १ ऑगस्टपासून सरकारने देण्यास सुरुवात केली. दूध संघांनी ऑनलाईन माहिती भरूनही प्रशासनाकडून चालढकल होत आहे. सर्वच संघाचे अनुदान १० सप्टेंबर नंतर देणे बाकी आहे. अनुदान वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांना कमी दर मिळण्यास सुरुवात झाली आहे, तर सरकार म्हणते, आमच्याकडे अनुदानासाठी पैसे आहेत, मात्र प्रत्यक्षात यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून अनुदानाचा प्रश्न सरकार व दुधसंघानी त्वरित मिटवावा, अन्यथा आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

पर्यावरण विभागाने प्लास्टिक बंदी केल्याने दुधाच्या पाऊच पॅकिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे आधी वेफर्स, गुटखा यांचे पाऊच बंद करा, मगच दूध पिशव्यांकडे वळा, अशी मागणी करत या नियमातून दूध पिशव्यांना वगळावे, अशी मागणी त्यांनी केली.

राजू शेट्टी म्हणाले

>> केंद्र सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही
>> खासगी विमा कंपन्या पोसण्यासाठीच पंतप्रधान कृषी पीक विमा योजना
>> माझी जात शेतकऱ्याची, धर्म कृषक आहे
>> बाटलीतून दूध दिल्यास ग्राहकांवर बोजा पडेल
>> शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणाऱ्यांसोबत आम्ही युती करू

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत