“…तर मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करणार”; मनसेचा आक्रमक इशारा |

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी मालिकांचे चित्रीकरण सुरू असून टीममधील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान मनसेने मालिकांचे निर्माते आणि सर्व मनोरंजन वाहिन्यांच्या संचालकांना इशारा दिला आहे. मालिकांच्या शूटिंगसाठीच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा न करण्याबाबत मनसेने इशारा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याबाबत एक पत्र लिहिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही त्यांनी ट्विट केलं आहे. कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड, हलगर्जीपणा केल्यामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांच्या जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल’ असं म्हटलं आहे. “आपल्या मनोरंजन वाहिनीच्या तसेच निमिर्तीसंस्थेच्या मालिकांच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे सर्वोतोपरी पालन करणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, याचं भान प्रत्येक मनोरंजन वाहिनीने तसेचं मालिकांच्या निर्मात्यांनी बाळगायलाच हवं. कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड, हलगर्जीपणा केल्यामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांच्या जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल” असं अमेय खोपकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, मराठी चित्रपट सृष्टीत सुप्रसिद्ध आणि गुणी ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या साताऱ्याला आल्या होत्या. याचठिकाणी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत