..तर साखरेची आयात होऊ देणार नाही!

शरद पवार यांच्या प्रश्नावर गडकरींचे उत्तर ; ४५ रुपयांपर्यंत दर ठेवण्याची तंबी

साखर कारखानदारांनी बाजारातल्या साखरेची किंमत ४५ रुपयांपर्यंत ठेवली तर साखर आयात न करण्याची स्पष्ट हमी केंद्रीय रस्ते, महामार्ग व जलसंपदामंत्री नितीन गडकरींनी बुधवारी स्पष्टपणे दिली. गंमत म्हणजे, गडकरींनी हे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी चक्क जाहीरपणे विचारलेल्या प्रश्नावर दिले..

राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदार महासंघाच्या ५८व्या वार्षिक सभेमध्ये गडकरी मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कारखानदारांना पारितोषिकांचे वितरण झाल्यानंतर गडकरींचे भाषण झाले. ते भाषण संपताच पवारांनी माइक हातात घेतला आणि गडकरींना प्रश्न विचारला. ‘केंद्र सरकारने साखरेवर साठा नियंत्रण (स्टॉक लिमिट) लावलंय. तसेच साखर आयातीचीही चर्चा आहे. त्यावर तुमची भूमिका काय आहे?’ असा पवारांनी प्रश्न विचारला. त्यावर, ‘तुम्ही ४५ रुपये प्रतिकिलोपर्यंत दर बाजारात ठेवले तर मी साखर आयात होऊ  न देण्याची हमी घेतो,’ असे गडकरींनी सांगताच सभागृहात  टाळ्यांचा कडकडाट झाला. बोलण्याचा कदाचित विपर्यास होऊ  शकतो, हे लक्षात घेऊन गडकरींनी पुन्हा ४५ रुपयांचा दर ही ‘लक्ष्मणरेषा’ असल्याचे स्पष्ट केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत