तापाच्या गोळ्या नसताना हात धुवायला लाखोंचा खर्च; रायगड जिल्हा परिषदेचा पराक्रम!

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात  व उपकेंद्रांत येणाऱ्या रुग्णांना ‘पॅरासिटामॉल’ नावाची गोळी दिली जाते. मात्र गेले कित्येक महिने ह्या गोळ्यांचा पुरवठा होत नसताना आरोग्य केंद्रांना व उपकेंद्रांनी हात धुवायच्या ‘हँडसॅनिटायझर’ च्या खरेदीचा भार जिल्हा परिषदने आरोग्य केंद्राच्या माथी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

हँडसॅनिटायझर खरेदीसाठी निविदा न काढल्याची माहिती जिल्हा परिषद मधिल सूत्रांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात दिलेल्या भेटीत ही गंभीर बाब समोर आली. सविस्तर माहिती अशी की, प्रत्येक दिवसाच्या ओपीडी मधील साधारण ऐंशी टक्के रुग्णांना ‘पॅरासिटामॉल’ नावाची गोळी दिली जाते. ही गोळी ताप व दुखण्यावर दिली जाते. मात्र गेले आठ महिने जिल्हा परिषदकडून या गोळीचा पुरवठा होत नसल्याचे समजले. विशेष म्हणजे कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्राने हँडसॅनिटायझरची मागणी केली नव्हती. जिल्हा परिषदच्या आरोग्य खात्याने हा पराक्रम करत कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया न करता खरेदी जिल्हा परिषदने करायची आणि बिल प्राथमिक आरोग्य केंद्राने भरायचे असे घडत आहे.

रुग्ण कल्याण समितीची परवानगी नाही

प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच हजार पेक्षा जास्त रक्कमेची खरेदी करण्यासाठी रुग्ण कल्याण समितीची परवानगी लागते. निविदा प्रक्रिया करून मग खरेदी केली जाते.  हँडसॅनिटायझर खरेदीसाठी अशी कोणतीही परवानगी घेतली गेली नसल्याचे समोर आले आहे.

‘हँडसॅनिटायझर’ कुणाचे हात धुवायला?

फिरती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले असता तापाची वा जुलाबाची गोळी नसल्याचे सांगतात. मात्र अचानक हँडसॅनिटायझरची गरज का उद्भवली असा प्रश्न निर्माण होतो.  प्रत्यक्षात आवश्यक औषधांचा तुटवडा असताना ‘हँडसॅनिटायझर’ प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांत हे ठराविक आणि एकाच कंपनीच्या उत्पादनची अचानक मागणी का करण्यात आली आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे.

ऑडिटसाठी ‘सेफ गेम’

प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच हजारांहून अधिक रक्कमेची ऑडिट होत नसल्याने केवळ ऑडिटच्या कचाट्यातून सुटण्यासाठी वरील आकडेवारी ठरवल्याचे दिसते. प्रत्येक आरोग्य केंद्राला नऊ तर आरोग्य उपकेंद्राला तीन हँडसॅनिटायझर दिले जात आहेत.

वर्क ऑर्डर नसताना जबरदस्ती 

जिल्ह्यात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या उपकेंद्रांच्या हँडसॅनिटायझर खरेदीच्या ऑर्डर्स नसताना, औरंगाबाद येथील वाळुंज औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या कंपनीचे हँडसॅनिटायझर आरोग्य खात्याकडून पीएचसी ला बिला सोबत पोच झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मधील अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आणि ती कंपनी यांच्यात साटेलोटे आहे अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

हात धुवायचा खर्च लाखोंचा 

पाचशे मिली हँडसॅनिटायझरच्या एका बाटली ची किंमत रु. 468 आहे. जिल्ह्यात एकूण पीएचसी 52 व आरोग्य उपकेंद्र – 288 आहेत. त्यावरून कुणा सूज्ञ व्यक्तीला किती हात धुवण्याचा खर्च किती खर्च असावा हे सांगण्याची गरज नसावी.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत