तामिळनाडू अलर्टवर; ‘गज’ चक्रीवादळ धडकणार

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन

तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात आज (गुरुवार) गज चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वादळ तयार झाले आहे. दरम्यान दोन्ही राज्यातील किनारपट्टी भागातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. चेन्नईतील अनेक भागात वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी अलर्ट झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारी दुपारी हे वादळ तामिळनाडूच्या कुड्डलूर आणि पम्बन या किनारपट्टी भागाला धडकण्याची शक्यता आहे.

गेल्या 48 तासापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे या चक्रीवादळाची निर्मित झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. हे वादळ सप्टेंबर महिन्यात आलेल्या तितली वादळापेक्षा मोठे असल्याचा अंदाज आहे. गज वादळ 12 ते 15 किमी ताशी वेगाने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाकडे येत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग हा 90 ते 100 किलोमीटर असण्याची शक्यता आहे.

गज वादळामुळे महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याचे पुणे हवामान विभागाने सांगितले. तर मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत