ताम्हाणी घाटात वाहनांना लुटणारी टोळी जेरबंद; पोलीस असल्याचा करीत होते बनाव 

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

माणगांव पुणे मार्गावरील ताम्हाणी घाट मार्ग हा पावसाळ्यातील निसर्गरम्य धबधब्यासाठी प्रसिध्द आहे. विलोभनिय धबधब्यांमुळे पावसाळ्यात या घाटमार्गावर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. विळे भागाड येथील औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र सिमलेस व पोस्को स्टिल कंपनीमुळे कच्चा माल व पक्क्या मालाची वाहतुक करणाऱ्या मोठ्या वहानांचीही रहदारी मोठ्या प्रमाणात असते. यांची वाहने रस्त्यात अडवून चालकांकडून जबरदस्तीने पैशाची मागणी करीत लुटणारी टोळी गेली अनेकदिवस ताम्हाणी घाटात सक्रीय होती. याबाबत माणगांव पोलिसांना खबर मिळाली होती परंतू टोळी हातात लागत नव्हती.  अखेर मिळालेल्या विश्वसनिय खबरीनुसार कारवाई करीत माणगांव पोलिसांनी पो.नि. विक्रम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रंगेहात पकडत ताब्यात घेतले.

 

माणगांव पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून ताम्हाणी घाटात एका मारुती वाहनांवर पोलीसांची पाटी लावली होती. रात्रीच्या वेळी वाहन चालकांना थांबवून आपण पोलीस असल्याची बतावणी करीत या चालकांकडून खोटी कारणे दाखवून पैसे वसूलीचे प्रकार चालू होते. वाहनचालकांनी पैसे न दिल्यास या बनावट पोलीसांकडून वाहन चालकांना मारहाणदेखील होत होती. वसूली करतांना 200 ते 500 रुपयांपर्यंत मर्यादीत असल्याने याबाबतची तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते.

 

याबाबत महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पोस्को स्टील  कंपनी ट्रान्सपोर्टला विश्वासात घेत या मार्गावर पोलीस गस्त वाढविण्यात आली. माणगांव पोलीसांचे गस्त चालु असताना 31 जुलै 2018 रोजी माहिती मिळाली होती. त्यानुसार माणगांव पोलीसांनी घटनास्थळी पोहचले.  तेव्हा   ताम्हाणी घाट परिसरात एक सफेद रंगाच्या कारमध्ये पोलीसाची पाटी ठेवुन पोलीस असल्याचा बनाव करीत वाहन चालकांकडून पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी चौघांना रंगेहात पकडीत अटक केली.

 

त्यावेळी सफेद रंगाची कार नं. एम. एच. 04 ई. क्यु 6457 व त्या मधील 4 इसम समाधान यंका साबळे (26) रा. वरसे ता. रोहा,जि. रायगड, विशाल संभाजी वाघमारे (30), रा. शिवभक्ती पार्क बिल्डींग, भाटे वाचनालय जवळ रोहा, ता. रोहा जि.रायगड, दिनेश दामोदर सकपाळ (22) रा. वरसे, ता. रोहा, जि. रायगड, विजय जगमोहन भोई (40) रा. वरसे ता. रोहा, जि. रायगड यांना रंगेहात पकडुन त्यांच्याकडून  चालकाकडील जबरीने काडुन घेतलेली रक्कम 3870/- तसेच पोलीसाची पाटी, मारहाण, केलेला लोखंडी पाना, कार, पोलीसांनी जप्त केली

1 ऑगस्ट   2018 रोजी आरोपींना न्यायालयात हजर केले असता माणगांव न्यायालयाने त्यांना दि. 4 ऑगस्ट पर्यत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. माणगांव पोलीसांनी ताम्हाणी घाटात गस्त वाढवून केलेल्या कार्यवाहीमुळे वाहन चालक, प्रवासी, पर्यटक, यांच्यात असलेली भिती दुर झाली असून माणगांव पोलीसांनी केलेल्या कारवाही बद्दल समाधान व्यक्त होत आहे. या प्रकरणी माणगांव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. 134/2018 भा. द. वी. सं. कलम 170, 341, 323, 394, 34 अन्वये दि. 31 जुलै 2018 रोजी गुन्हा दाखल झाला  आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत