तावडेंचे डाव्यांना खुले आव्हान; बिंदू चौकात या…

कोल्हापूर : रायगड माझा 

डाव्या विचारसरणीचे लोक शाळा बंद व शाळा कंपनीकरण कायद्याबद्दल धादांत खोटा प्रचार करीत आहेत. दहा पटाखालील शाळांचे समायोजन केल्या असताना काही लोक खोटं अभियान राबवून पालकांची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे बहुजन समाजातील विद्यार्थी गुणात्मक शिक्षणापासून दूर लोटला जात आहे. त्यांचा हा कुटील डाव भाजप सरकार हाणून पाडील. त्यांनी बिंदू चौकात यावे, खुली चर्चा करायला आपण तयार आहोत, असे जाहीर आव्हान शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे दिले.

कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी (दि.13) शिवाजी विद्यापीठातील अतिथीगृहात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. शिक्षणमंत्री तावडे म्हणाले, दहा पटाखालील शाळांचे समायोजन केल्याने त्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळू शकते. 1300 पैकी 547 शाळांचे समायोजन केले आहे. काही शाळांबाबत प्रवास व्यवस्थेच्या अडचणी आहेत, त्या दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. चांगल्या गोष्टींना खीळ घालण्याचे खटाटोप ठराविक लोक करीत आहेत. दहा पटाखालील शाळा व कंपनी कायदयाचा आधार घेत काही लोक खोटे अभियान राबवित आहेत. शाळा बंदबाबत पालकांनी केलेल्या एसएमएसवर स्पष्टीकरण दिले आहे. ठराविक विचारसरणीच्या लोकांनी ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांनाही आंदोलनात सहभागी करुन घेऊन त्यांचीही दिशाभूल केली आहे, असे ते म्हणाले.

राज्य सरकारने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले आहे. 13 ‘ओजस’ व शंभर ‘तेजस’ शाळांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी ‘ओजस’ शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. 15 जूनला आंतरराष्ट्रीय शाळा सुरु होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना सीबीएसई, आसीएसई शाळांपेक्षा अधिक दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.

दहावीच्या कल चाचणीचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. यात 21 विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे राहिला आहे. त्यानंतर ललित कला, कला शाखेस प्राधान्य दिल्याने विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणार आहे. वाणिज्य शाखेकडे कल वाढला असला तरी प्रवेशाची अडचण निर्माण होणार नाही. पुरेशा जागा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार क्लस्टर विद्यापीठे निर्माण करणार आहे. 10 ते 20 कॉलेजचे मिळून स्वायत्त विद्यापीठ निर्माण केले जाणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियानातून मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. यात ‘रयत’ सारख्या संस्था पुढे येत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.