तीस हजार कोटींची करचोरी उघड

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

 

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत एक हजार आठशे पस्तीस प्रकरणांमध्ये मिळून २९ हजार ८८ कोटी रुपयांच्या करचोरीचा छडा लावण्यात यश आले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या चौकशी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

एकूण प्रकरणांपैकी ‘जीएसटी’च्या गुप्तवार्ता विभागातर्फे (डीजीजीआय) ५७१ प्रकरणांचा छडा लावण्यात आला असून, त्यामध्ये ४ हजार ५६२ कोटी रुपयांची करचोरी केल्याचे उघड झाले आहे. एकूण प्रकरणांमध्ये सर्वाधिक प्रकरणे सेवाकराच्या चोरीची असल्याचे आढळून आले आहे. सेवाकराच्या एकूण १,१४५ प्रकरणांचा छडा लावण्यात आला असून, या माध्यमातून २२ हजार ९७३ कोटी रुपयांची करचोरी समोर आली आहे. याच कालावधीत केंद्रीय उत्पादनशुल्क चोरीच्या ११९ घटना उजेडात आल्या असून, या माध्यमातून एक हजार ५५३ कोटी रुपयांची करचोरी झाल्याचे उघड झाले आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार करचोरीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण करचोरीच्या जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये अद्याप केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन विभागाच्या (सीबीआयसी) आकडेवारीचा समावेश करण्यात आलेला नाही.

चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबरपर्यंत एकूण करचोरीपैकी पाच हजार ४२७ कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली.

पकडण्यात आलेली करचोरीची प्रकरणे जुनीच असून, चालू आर्थिक वर्षात त्यांचा पत्ता लावण्यात यश आले आहे. वस्तू आणि सेवा कराची तीन हजार १२४ कोटी रुपयांची चोरी, सेवाकराची दोन हजार १७४ कोटी रुपयांची चोरी आणि केंद्रीय उत्पादन शुल्काची १२८ कोटी रुपयांची चोरी पकडण्यात यश आले आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एकूण वसुलीपैकी बहुतांश वसुली एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आली असून, त्याचे श्रेय करचोरांवर कडक कारवाई करण्यात हयगय न करणाऱ्या ‘सीबीआयसी’ला देण्याची आवश्यकता आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

‘सीबीआयसी’ची भूमिका महत्वाची

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन विभागाने (सीबीआयसी) एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत जीएसटीचोरी रोखण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला. करचोरी रोखण्यासाठी ‘सीबीआयसी’तर्फे जीएसटी आयुक्तपदी (चौकशी) नीरज प्रसाद यांची नियुक्ती केली. गेल्याच महिन्यात केंद्रीय अर्थ मंत्रालयाने करचोरी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी पोलिस, बीएसएफ, सीआयएसएफ आणि तटरक्षक दल यांनाही चौकशीयंत्रणेत जोडून घेतले.

२९ हजार ८८ कोटी रुपये

पकडण्यात आलेली एकूण करचोरी

एप्रिल ते ऑक्टोबर २०१८

कारवाईचा कालावधी

कराचा प्रकार पकडलेली चोरी (कोटी रुपयांत)

वस्तू आणि सेवा कर ३,१२४

सेवा कर २,१७४

केंद्रीय उत्पादन शुल्क १२८

कराचा प्रकार चोरी उघड (कोटी रुपयांत)

सेवाकर २२, ९७३

उत्पादन शुल्क १, ५५३

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत