‘ती’ ऑडिओ क्लिप माझीच…शिवसेनेने तोडून-मोडून दाखवली; मुख्यमंत्र्यांचा वसईत पलटवार

मुंबई : रायगड माझा 

ती ऑडिओ माझीच… पण आमची नैतिकता समोर आली असती म्हणून शिवसेनेने ऑडिओ क्लीप तोडून-मोडून दाखवली. ऑडिओ क्लीपमधील सुरुवातीच्या आणि शेवटच्या दोन ओळी वगळून एडिट करून मधलाच भाग शिवसेनेने जाहीर सभेत ऐकवला, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी वसईच्या सभेत संपूर्ण क्लीप ऐकवली. एकीकडे गुंडागर्दी करणारे आणि दुसरीकडे खंडणीखोर…अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, एका गोष्टीचे दुःख होतं, वनगा यांच्या मृत्यूचे भांडवल शिवसेना आणि सुपुत्र करत आहेत. दिवंगत चिंतामण वनगा यांचा आत्मा त्यांना माफ करणार नाही.

कोणत्या स्तराला जाऊन भाषण सुरू आहेत, भाजपचे रक्त तुम्ही पाहिले नाही, तुमच्या जन्मापूर्वीपासून भाजपने संघर्ष केला. आमचे रक्त भेसळयुक्त म्हणता मग वनगांना पक्षात का घेतले? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

शिवसेना हे बाळासाहेबांचे व्हिजन होते. ती स्वप्ने आता कुठे गेली? शिवसेना प्रत्येक गोष्टीला विरोध करते. आता ‘शिवविरोध सेना पक्ष’ तयार झाला, असा खोचक टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत