तुमच्या प्रार्थना मला लढण्यासाठी उर्जा देतात.’ – इरफान खान

रायगड माझा वृत्त 

अभिनेता इरफान खान त्याच्या हटके अंदाजातील अभिनयाने प्रसिद्ध आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा त्याचा खुप मोठा फॅन क्लब नेहमीच त्याला विविध भूमिकांमध्ये बघायला आतूर असतो. सध्या कर्करोगाशी झुंज देत असलेला इरफान मात्र या आजाराने खचला आहे. आपल्या वेदनांना वाट मोकळी करुन देत इरफानने लिहीलेले भावनिक पत्र नुकताच त्याने शेअर केलं आहे. इरफानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर झाला आहे. सध्या इंग्लड येथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. हे पत्रं टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलं आहे. त्याच्या आजाराबद्दलचा त्रास आणि उपचार याविषयी तो या पत्रातून व्यक्त झाला आहे.

 

 

काय लिहिले आहे इरफान खानने पत्रात :
‘न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हे नावच माझ्यासाठी नवीन होतं. या दुर्धर आजाराविषयी फार माहिती उपलब्ध नसल्याने उपचार काय करावा हे निश्चित नव्हते. मी एका प्रयोगाचाच हिस्सा जणू झालो होतो. आजारापुर्वी मी एका वेगळ्याच खेळाचा भाग होतो. माझ्यासोबत खूप अपेक्षा, स्वप्न, इच्छा, ध्येय होती. ते पूर्ण करण्याच्या मी प्रवासात होतो आणि अचानक मला टीसीनं सांगितलं, तुम्ही उतरण्याचं ठिकाण आलंय, आता खाली उतरा.

मला होणाऱ्या वेदना भयंकर आहेत. त्यावेळी फक्त आणि फक्त वेदनाच जाणवतात. संपूर्ण विश्व त्यावेळी एक होतं आणि त्यावेळी केवळ एकच गोष्ट तीव्रतेने जाणवते ती म्हणजे वेदना. ज्या रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरु आहेत, त्याच्यासमोर लॉर्ड्स स्टेडियमची मागची बाजू दिसते. मला जाणवणाऱ्या वेदनांमध्ये विव्हियन रिचर्ड्सचा हसऱ्या चेहऱ्याचा पोस्टर मला दिसतो. पण ते जग माझं राहिलंच नाही असं वाटू लागलं. जीवन-मरणाच्या या खेळात केवळ एकच मार्ग आहे. एका बाजूला रुग्णालय आणि दुसऱ्या बाजूला स्टेडियम. कुठेच कोणत्याही गोष्टीची शाश्वती नाही आणि हीच गोष्ट माझ्या मनाला खूप दुखावते आहे. या जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे अनिश्चितता. हेच मला त्यावेळी जाणवलं. माझी ताकद काय आहे, शक्ती काय आहे हे ओळखून हा खेळ अधिक चांगल्या प्रकारे खेळणं. इतकंच काय ते  माझ्या हातात आता राहिलं आहे.

जगभरातून अनेक मंडळी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यापैकी अनेकांना तर मी ओळखत सुद्धा नाही. या प्रार्थनांमुळे मला बळ मिळू लागलं आहे. तुमच्या प्रार्थना मला लढण्यासाठी उर्जा देतात.’ – इरफान खान

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत