रायगड माझा वृत्त
तेलंगणा राज्यात आता सरकारी आणि निमसरकारी संस्थांतील 95 टक्के नोकऱ्या स्थानिक नागरिकांना मिळणार आहेत. या संदर्भातील राज्याच्या प्रस्तावाला नुकतीच राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नवीन झोनल प्रणालीचा हा प्रस्ताव राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविला होता. बुधवारी राष्ट्रपती कोविंद यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर गृह मंत्रालयाने या संदर्भातील राजपत्र गुरुवारी प्रसिद्ध केले. नवीन झोनल प्रणालीद्वारे 95 टक्के सरकारी आणि शिक्षण क्षेत्रातील 95 टक्के नोकऱ्या स्थानिक नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बाहेरील नागरिकांना केवळ पाच टक्के नोकऱ्या मिळतील.
या झोनल प्रणालीनुसार, राज्यात सात झोन असतील तर दोन मल्टी-झोन असतील. यामुळे राज्यातील एका जिल्ह्यामधील नागरिकांनाही दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नोकरी मिळविताना अडचणी येणार आहेत.
दरम्यान, या खेळीद्वारे राव यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. या नव्या प्रणालीद्वारे सर्वात प्रथम पंचायत सचिवांच्या 9500 जागा भरण्यात येतील. त्यामध्ये राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांमध्ये स्थानिक लोकांना प्रत्येकी किमान 300 जागा मिळतील.