तेलंगणा विधानसभा बरखास्तीचे संकेत; डिसेंबरमध्ये निवडणुका?

 

रायगड माझा वृत्त 

हैदराबाद : तेलंगणामध्ये मुदत पूर्व विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. तेलंगणा विधानसभा बरखास्त करून येत्या डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याचे संकेत तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमूख (टीआरएस) आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले आहेत.  राज्यात लवकर निवडणुका घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री आणि टीआरएस आमदारांनी सहमती दर्शविली असल्याचे संकेत मुख्यमंत्री राव यांनी हैदराबाद जवळ काल (रविवारी) मेगा रॅलीत दिले आहेत.

तेलंगणा विधानसभा बरखास्त केली जाणार असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. ही शक्यता मुख्यमंत्री राव यांनी नाकारलेली नाही. राज्यात मुदत पूर्व निवडणुका घ्याव्यात, अशी इच्छा के. चंद्रशेखर राव यांची आहे. ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा बरखास्त करण्याची शक्यता आहे. यामुळे डिसेंबरमध्ये निवडणुका होतील, अशी रणनिती त्यांनी ठरविली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आम्ही दिल्लीच्या सत्तेपुढे झुकणार नाही. आम्ही सत्तेत कायम राहू, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता 
आगामी वर्षात एप्रिल- मे दरम्यान विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र झाल्यास काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशमध्ये केंद्रातील भाजप सरकारविरोधात वातावरण आहे. यामुळे आंध्र प्रदेशसह तेलंगणामध्ये काँग्रेस मजबूत होण्याची शक्यता आहे. तेलगू भाषिक असलेला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हा प्रदेश याआधी काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र, आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर या भागातील राजकीय समीकरणे बदलली.  आंध्र प्रदेशचे २०१३ मध्ये विभाजन होऊन तेलंगणा या २९ व्या राज्याची निर्मिती झाली. यानंतर लगेच तेलंगणामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात के. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएस पक्षाला सर्वाधिक ६३ जागा मिळाल्या होत्या.

राजस्थानसह तेलंगणाची निवडणूक घेण्याची सूचना
दरम्यान, के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या दोन महिन्यात दोनवेळा भेट घेतली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आणि मिझोराम या राज्यांबरोबरच तेलंगणा विधानसभा निवडणूक घेण्याची सूचना राव यांनी केंद्राकडे केली असल्याचे समजते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत