तेलंगण सरकारच्या दोन जाहिरातींमध्ये दाखवले एकाच महिलेचे दोन पती!

तेलंगण : रायगड माझा वृत्त 

वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या तेलंगण सरकारच्या दोन जाहिरातींमध्ये एकाच महिलेचे दोन पती दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे तेलंगण सरकारवर सोशल मीडियामधून प्रचंड टीका होत आहे. प्रशासनाने या जाहिरातींची गंभीर दखल घेतली असून जाहिरात बनवणार्‍या अ‍ॅड एजन्सीला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. तेलंगण सरकारच्या नव्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी या दोन जाहिरातील बनवण्यात आल्या होत्या.

तेलगू वर्तमानपत्रातील या महिलेचा पती आणि मुलासोबतचा फोटो बरोबर आहे. पण इंग्लिश वर्तमानपत्रातील जाहिरातीमध्ये चुकीच्या माणसाला या महिलेचे पती दाखवण्यात आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियामधून तेलंगण सरकारवर बोचरी टीका होत आहे. माहिती आणि जनसंर्पक खात्याने दोन अ‍ॅड एजन्सीना नोटीस बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. ‘रितू बिमा’ आणि ‘कांती वेलुगू’ या दोन जाहिरातींमध्ये महिलेचा फोटो वापरण्यासाठी त्या महिलेची पूर्वपरवानगी घेतली होती का? त्या संदर्भातही अ‍ॅड एजन्सीकडून स्पष्टीकरण मागितले आहे. ‘रितू बिमा’ ही शेतकर्‍यांसाठीची विमा योजना आहे तर ‘कांती वेलुगू’ ही डोळया संदर्भातील योजना आहे.

14 ऑगस्टला ही जाहीरात प्रसिद्ध झाली होती. अ‍ॅड एजन्सीने परवानगी न घेता फोटो वापरला असेल किंवा काही चुकीचे केल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल असे अधिकार्‍याने सांगितले. सदर महिला सुर्यापेट जिल्ह्यात राहणारी आहे. काही दिवसांपूर्वी काही लोकांनी आपल्याशी संपर्क साधला होता. त्यांनी आमच्या कुटुंबाचा एकत्रित फोटो काढला व सरकारी योजनेतंर्गत फायदा होईल असे सांगितले. जाहिरातीमध्ये दुसर्‍या पुरुषासोबतचा फोटो पाहिल्यानंतर आपल्याला धक्का बसला. कुटुंबियांकडून चार गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्याचे तिने सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत