‘त्या’ आश्वासनांवर आम्ही हसतो आणि पुढे जातो: गडकरी

मुंबई : रायगड माझा वृत्त 

‘आम्ही सत्तेत येणार नाही याची खात्री होती. त्यामुळे आम्ही आश्वासन देत सुटलो. आता आम्ही त्या आश्वासनांवर हसतो आम्ही पुढे जातो’ असं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी या विधानाची दखल घेतली असल्यामुळे गडकरी गोत्यात येण्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीवरील ‘अस्सल पाहुणे, इरसाल नमुने’ या कार्यक्रमात मकरंद अनासपुरेंनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमात टोलबंदीवर चर्चा सुरू असताना नाना पाटेकरांनी ,’ तुम्ही निवडणुकीच्या वेळी काहीतरी वेगळं बोलता आणि नंतर काही तरी वेगळं बोलता’ असा टोला गडकरींना लगावला.

यावर गडकरी म्हणाले, ‘मी वैयक्तिक अशी आश्वासनं दिली नाही. राजकारणात अशी विधानं करावी लागतात. त्यात आम्ही सत्तेत येणार नाही याचा आम्हाला दृढ विश्वास होता. त्यामुळे सगळे म्हणाले तुम्ही बोला,आश्वासनं द्या ,जबाबदारी थोडीच येणार आहे. आता सत्तेत आलो. ते(विरोधक) आता विचारतात तुम्ही असं बोलला होता. मग आता काय करणार? आम्ही हसतो आणि पुढे जातो’.

एकंदर पक्षाच्या नेत्यांची आश्वासनांबद्दलची ही रणनीती सांगत असताना आपण मात्र असं कधीच करत नसल्याचंही गडकरींनी स्पष्ट केलं. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी गडकरींचा हा व्हिडिओ ट्विट केला असून ‘ जनतेच्या स्वप्नांचा आणि विश्वासाचा सत्तेच्या हव्यासापोटी बळी दिला आहे’ असं विधानही केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच गडकरींनी अजून तरी यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत