थर्माकोल बंदी कायम ,थर्माकोलच्या मखराशिवायच यंदाचा गणेशोत्सव

रायगड माझा वृत्त :

मुंबई : सर्वसामान्यांबरोबरच  पर्यावरणाला घातक असलेल्या  वस्तूना बंदी घातल्यानंतर केवळ थर्माकोलला सूट देणे  न्यायिक होणार नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने थर्माकोलच्या वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी कायम ठेवली आहे.

न्यायमूर्ती अभय ओक  आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने  बंदीसंदर्भात सविस्तर आदेश दिला. थर्माकोलच्या वस्तूंची विल्हेवाट लाण्यासाठी पुरेसा कालावधी दिला होता. तसेच राज्य सरकारच्या कमिटीकडे दाद मागण्याची मुभा देताना याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. असे असताना पुन्हा त्यांना सूट देणे योग्य नाही, असे स्पष्ट करून याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे थर्माकोल व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून, गणेशोत्सावासाठी तयार करण्यात आलेली मखरे वापरात येणार नाहीत. त्यामुळे या वर्षीचा  गणेशोत्सव थर्माकोलच्या मखरांशिवाय  साजरा करावा लागणार आहे.

पर्यावरणाला घातक असलेल्या प्‍लास्टिक तसेच थर्माकोलवर राज्य सरकारने घातलेल्या बंदीवर चार महिन्यापूर्वीच उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करताना या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसा कालावधी दिला होता. मात्र  गणेशोत्सवासाठी थर्माकोलची घाऊक खरेदी खूप पूर्वी असल्याने आणि  राज्य सरकारने मार्चमध्ये बंदी लागू केल्याने  डेकोरेटर आणि कलाकारांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा करून,  यंदाच्या उत्सवासाठी थर्माकोल वापरण्याची मुभा द्यावी, अशा विनंती करणारी याचिका  थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशनच्यावतीने अ‍ॅड. मिलिंद परब  यांनी दाखल केली होती. त्या याचिकेवर  न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद परब आणि अ‍ॅड.मिलींद साठे यांनी युक्तीवाद करताना, गणेशोत्सवाच्या मखरांसाठी काही महिने अगोदरच ऑर्डर येत असल्याने या ऑर्डरनुसार  घाऊक व्यापारी थर्माकोलची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. या व्यवसायात मखर तयार करणार्‍या कलाकारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याने त्यांना या बंदीचा फटका बसणार आहे. तसेच गणेशोत्सवात मखराचा वापर करून झाल्यानंतर ते दहा दिवसात परत केल्यास मखराच्या किंमतीच्या पाच टक्के रक्कम परत देण्याचा मानस आहे. त्यामुळे थर्माकोल एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावण्यास सोपे जाईल, असा दावा करून थर्माकोलवरील बंदी यंदाच्या गणेशोत्सवात उठवावी अशी विनंती केली. मात्र न्यायालयाने सुनावणीनंतर  याचिका फेटाळून लावली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत