दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा लिलाव होणार

तस्करी आणि विदेशी चलन विनिमय कायद्याचा भंग केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा लिलाव करण्यात अर्थ मंत्रालय अपयशी ठरल्यानंतर आता सीबीआयने दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्याची तयारी सुरू केली आहे. टाडा न्यायालयाने नुकताच १९९३ मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल सुनावला होता. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावताना इतर ३३ फरारी आरोपींची संपत्ती जप्त करण्याचा आदेश सीबीआयला दिला होता. त्यात दाऊदचेही नाव होते. न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्याची तयारी सुरू केली आहे.

आरोपींच्या जप्त केलेल्या संपत्तीच्या लिलावाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, असे आदेश न्यायालयाने पोलीस अधीक्षक, सीबीआय आणि एसटीएफला दिले होते. त्यानुसार सीबीआय, पोलीस अधीक्षक आणि एसटीएफने फरारी आरोपींच्या मुंबई आणि देशातील विविध ठिकाणी असलेल्या संपत्तीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. सीबीआयकडून दाऊदच्या संपत्तीची यादी तयार करण्यात येत असून त्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारितील महसूल विभागाची मदत घेतली जात आहे. तसेच ही यादी तयार करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडेही मदत मागितली आहे. दाऊदच्या संपत्तीची इत्यंभूत माहिती देण्यात यावी यासाठी दोन्ही विभागांशी पत्रव्यवहार केला आहे. लिलाव प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर आम्ही त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात केली आहे, असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

टायगर मेमन, मोहम्मद डोसा यांच्यासह इतर आरोपींच्या संपत्तीची माहिती मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहोत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी सरकारने डिसेंबर २०१५ मध्ये एका खासगी कंपनीची नेमणूक केली होती. दमन येथील चार भूखंड, हॉटेल, माटुंग्यातील एक फ्लॅट आणि कारसह सात मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत