दारूसाठी केले सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

दारू पिण्यासाठी पैसे मिळावेत म्हणून सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना आज एमएचबी पोलिसांनी अटक केली. आकाश रामाद शिवाग आणि सुजित गुरुमुखसिंग हिर अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना न्यायालयाने 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार महिला या दहिसरच्या गणपत पाटील नगरमध्ये राहतात. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. महिलेचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. तर आकाश आणि सुजित हे दोघे त्याच परिसरात राहतात. दारूसाठी पैसे नसल्याने त्या दोघांनी मुलाच्या अपहरणाचा कट रचला. महिलेकडे खूप पैसे असतात. मुलाचे अपहरण केल्यास महिला सहजपणे पैसे देईल, असे त्या दोघांना वाटत होते.

रविवारी सायंकाळी आकाशने सुजितच्या मदतीने मुलाचे अपहरण केले. अपहरण केल्यावर आकाशने मुलाच्या आईला फोन केला. फोन करून मुलाच्या अपहरणाची माहिती दिली. 20 हजार रुपये दिल्यास मुलाला सोडू असे महिलेला सांगितले. महिलेने कसेबसे 20 हजार रुपये जमा केले. जमा केलेले पैसे महिलेने आकाशला दिले. पैसे दिल्यावर त्या दोघांनी मुलाला सोडले. मुलाला सोडल्यावर आकाश आणि सुजित तेथून निघून गेले. त्या दरम्यान महिलेचा पती घरी आला. तिने घडल्या प्रकाराची माहिती पतीला दिली.

महिलेने एमएचबी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती सांगितली. वरिष्ठ निरीक्षक पंडित ठाकरे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आहेर, उपनिरीक्षक वाघचौरे, पोलीस नाईक तानाजी मोरे, हेड कॉन्स्टेबल बशीर शेख, प्रवीण जोपाले यांनी तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक दहिसर येथील एका बार जवळ गेले. तेव्हा दारू ढोसून आणि मटणावर ताव मारून बाहेर पडलेल्या आकाश आणि सुजितला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. दारूसाठी पैसे मिळावेत म्हणून मुलाचे अपहरण केल्याची त्या दोघांनीही कबुली दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत