दिया जाईलकर हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची आ. अनिकेत तटकरेची मागणी

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

माणगांव तालुक्यातील वावे येथील दिया जाईलकर हिची झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सखोल तपास सीआयडी मार्फत करावा व आरोपींना जेरबंद करावे असे सांगत याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे विधान परिषदेचे कोकण विभागाचे आमदार अनिकेत तटकरे यांनी स्पष्ठ केले. कु. दिया हिच्या घरी सांत्वनपर भेट दिली असतांना प्रसारमाध्यमांजवळ बोलतांना त्यांनी ही मागणी केली.

आमदार अनिकेत तटकरे यांनी गुरुवारी दिया जाईलकर यांच्या कुटूंबियांची वावे येथे भेट घेत आई वडीलांचे सांत्वन केले. यावेळी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना अनिकेत तटकरे यांनी सांगितले की, वावे गावांत झालेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या गोष्ठीचा तीव्र शब्दात निषेध करतो. आपल्या सर्वांच्या लहान भगिनीला अशा प्रकारे दुर्दैवी मरण येथे हे क्लेशदायक आहे. राजकारण विरहीत माणूसकीच्या भावनेतून सर्वांनी बघीतले पाहिजे. निवडणूका येतात जातात. मात्र त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य होणे हे निषेधार्ह आहे. दियाचे आई वडील अत्यंत दु:खी आहेत त्यांना आपल्या मुलीच्या अचानक जाण्याने जबरदस्त असा धक्का बसला आहे. त्यांना बळ देण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहीजे. दियाच्या हत्याप्रकरणाची गुन्हा अन्वेषण विभागाने सखोल चौकशी करावी अशी मागणी आपण सरकारकडे करणार आहोत. या घटनेतील आरोपींना कठोर सजा होण्यासाठी सरकारने अॅड. उज्वल निकम यांच्याकडे हा गुन्हा सोपवावा.  यांतील आरोपी व त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांनाच कठोर शिक्षा व्हावी अशीही मागणी यावेळी आ. अनिकेत तटकरे यांनी केली.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, तालुकाध्यक्ष प्रभाकर उभारे, पं.स. सदस्य शैलेश भोनकर, माजी उपसभापती सुभाष केकाणे, माणगांव नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, उपनगराध्यक्ष संदिप खरंगटे, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, नगरसेवक जयंत बोडेरे, नितीन वाढवळ, उणेगांव सरपंच राजेंद्र शिर्के, पत्रकार प्रभाकर मसूरे आदी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत