दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्याचा कट उधळला

रायगड माझा
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांनी रविवारी एका दहशतवाद्याला अटक केली असून त्याने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अक्षरधाम मंदिर उडविण्याचा कट रचल्याची कबुली दिली. दरम्यान, त्याच्या आणखी दोन साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.
प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने दिल्ली आणि आसपासच्या परिसरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

मथुरा येथे निजामुद्दीन-भोपाळ ट्रेनमध्ये टीसीला एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी या ट्रेनमध्ये झडती घेउन एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाच्या हवाली करण्यात आले. दहशतवादविरोधी पथकाने सदर तरुणाची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने वेडा असल्याचे नाटक केले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कटाची माहिती दिली.
बिलाल अहमद वागय असे या दहशतवाद्याचे नाव असून तो काश्मीरमधील अनंतनागचा रहिवासी आहे. आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने प्रजासत्ताक दिनी अक्षरधाम मंदिरावर हल्ला करणार होतो, असे त्याने सांगितले. तसेच, जामा मस्जिदच्या दोन हॉटेलमध्ये त्याचे साथीदार लपल्याची माहितीही त्याने दिली. दिल्लीतून बाहेर पडण्यापूर्वी आपणही याच हॉटेलात उतरलो होतो, असेही त्याने सांगितले. 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत