दिल्लीत आगीमध्ये होरपळून 17 जणांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी काहींनी इमारतीच्या गच्चीवरुन उडया मारल्या

(रायगड माझा ऑनलाईन)

नवी दिल्ली – उत्तर दिल्लीतील बवाना इंडस्ट्रीयल भागातील एका तीन मजली प्लास्टिक कारखान्याला शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून आता पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही काही जण इमारतीत अडकले असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या 15 ते 20 गाडया आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

आगीवर आता नियंत्रण मिळवल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वप्रथम इमारतीच्या तळ मजल्यावर आग भडकली. नेमकी कशामुळे ही आग लागली ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण प्लास्टिकमुळे ही आग वेगाने पसरली. आग लागली त्यावेळी कारखान्यात कामगार काम करत होते. आग वेगाने पसरल्यामुळे अनेक महिलांना बाहेर पडता आले नाही. खालचे मजले आगीच्या ज्वाळांनी वेढल्यामुळे काही कामागारांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवरुन उडल्या मारल्या. त्यात काही जण जखमी झाले आहेत.

संध्याकाळी 6.20 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच 10 गाडया घटनास्थळी पाठवल्या असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करुन आगीच्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. दिल्ली सरकार बचाव मोहिमेवर लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने या दुर्घटने प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत असे दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. मुंबईमध्येही अलीकडच्या काही दिवसात आगी लागण्याच्या मोठया घटना घडल्या असून त्यात अनेकांचा मृत्यू झाला .

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत