दिव्यांगांसाठी मतदान व्हावे सुलभ- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

अलिबाग: रायगड माझा  मतदान हा सर्व मतदारांचा अधिकार आहे. हा अधिकार बजावतांना मतदारांना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी निवडणूक यंत्रणेने खबरदारी घ्यायची असते. त्यातही जर मतदार हा दिव्यांग असेल तर त्यांना मतदान करणे हे सुलभ व्हावे यासाठी विशेष उपाययोजना करणे हे निवडणूक यंत्रणेचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.

दिव्यांग मतदारांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे सुलभ व्हावे यासाठी ‘ सुलभ निवडणूका’ या जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन आज  जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी वैशाली माने,  साईनाथ पवार, अकिल पठाण, एस.आर .सोनकर, के. एम. कुलकर्णी, तपस्वी गोंधळी  तसेच जिल्ह्यातील विविध अपंग संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित दिव्यांग संघटना प्रतिनिधींनी दिव्यांगांना सुविधा निर्माण करण्याबाबत आपले विचार मांडून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की,  जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांची नोंद घ्या,  त्यासाठी दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांनी आपल्याकडील माहितीचे  आदान प्रदान करावे. ही माहिती उद्या दि.27 पर्यंत तालुकास्तरावर प्राप्त करुन  ती जिल्हा निवडणूक शाखेकडे पाठवावी. दिव्यांगांसाठी मतदान प्रक्रियेची माहिती देण्याकरीता शिबिरे आयोजित करावीत. यासाठी दिव्यांगांच्या संघटनांनी प्रशासनाला सहकार्य करावे. दिव्यांग संघटना प्रतिनिधी व प्रशाकीय अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे मतदान केंद्रांची पाहणी करुन तेथील सुविधा दिव्यांगासाठी पूरक व योग्य असल्याची खात्री करावी. दिव्यांगांच्या गरजांनुसार या सुविधा अधिक सुलभ करण्यात याव्या, अशा सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांनी केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत