दीड शहाण्यांनी आधी समजून घ्यावे; राज ठाकरेंना शिवसेनेचे प्रत्युत्तर

 

मुंबई  : रायगड माझा वृत्त 

राज्य दुष्काळात होरपळत असताना शिवसेनेला राम मंदिराची आठवण झाल्याची टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते, असं उगाचच तोंडाचं डबडं वाजवत राहणाऱ्या दीड शहाण्यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं उठवलेला आवाज नीट समजून घेतला पाहिजे, अशी खोचक टीका शिवसेनेनं राज यांच्यावर केली आहे.

शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका मांडताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना सरकारमध्ये जरूर आहे, पण जनतेच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या अडीअडचणींच्या विषयांवर सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेनेशिवाय दुसरं कोण पुढं असतं, असा सवाल उद्धव यांनी केला आहे.

शिवसेना सत्तेतून बाहेर केव्हा पडणार? हा प्रश्न आता एक विनोद होऊन बसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांनी या टीकेचा समाचार घेताना शिवसेनेनं केलेल्या कामाची आठवणही करून दिली आहे. शिवसेनेच्या रेट्यामुळंच सरकारला राज्यात १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करावी लागली. त्यासाठी शिवसेनेनं सत्तेत राहून सरकारवर चौफेर दबाव आणला, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत