दीपक सावंत यांचा राजीनामा

मुंबई : रायगड माझा

मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी दिल्यानंतर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तडकाफडकी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

दरम्यान, सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यांनी सावंत यांना तूर्त थांबण्याचा सल्ला दिला. उद्या मंत्रिमंडळ बैठक होत असून या बैठकीस आपण उपस्थित राहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सावंत यांना सांगितल्याचे कळते.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत यांच्याऐवजी शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख विलास पोतनीस यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने दीपक सावंत यांना मंत्रिपद सोडावे लागणार, हे निश्चित झाले होते. सावंत यांच्या आमदारकीचा कार्यकाळ येत्या ७ जुलै रोजी संपत असल्याने त्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून दूर व्हावे लागणार होते. मात्र, आपल्याला पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही, हे कळताच सावंत यांनी तातडीने आपला राजीनामा पक्षप्रमुखांकडे सोपवला आहे.

दरम्यान, सावंत यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचल्यानंतरच त्याच्यावर पुढील सोपस्कार होणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.