दुसरीही मुलगी झाल्याच्या रागातून २ महिन्याच्या मुलीला पाजले विष

Image result for HATHKADIपुणे : रायगड माझा वृत्त 

 

विष पाजून पोटच्या दोन महिन्याच्या मुलीला ठार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली. दुसरीही मुलगीच झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे कृत्य केल्याचे उघड झाले. जयश्री प्रकाश पाडावे (वय २१) आणि प्रकाश बंडू पाडावे (२८, रा. सावर्डी, ता. शाहूवाडी) असे या दाम्पत्याचे नाव आहे. सिद्धी (वय २ महिने) असे मृत मुलीचे नाव आहे. शाहूवाडी-मलकापूर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दाम्पत्याला शनिवार (ता.१५) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावर्डीतील प्रकाश आणि जयश्री प्रकाश पाडावे या दाम्पत्याला प्रांजल ही २ वर्षाची पहिली मुलगी आहे. त्यानंतरही त्यांना मुलगीच झाली. दोन महिन्याची सिद्धी ही एकसारखी रडत असल्याने ते ४ ऑक्टोबर २०१८ ला करंजफेणच्या खासगी दवाखान्यात घेऊन गेले. मुलीची प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला सीपीआरमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता. यावेळी संशय आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विच्छेदनाशिवाय मृतदेह ताब्यात देणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र प्रकाश पाडावेने विच्छे्दनास तत्काळ विरोध दर्शविला. त्यामुळे संशय आणखी बळावला. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत मुलीचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करून पुढील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. व्हिसेरा पृथ्थकरण अहवालात थिमेटसारखा विषारी पदार्थ आढळल्याचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून पोलिसांना मिळाला. चौकशीवेळी पाडावे दाम्पत्याने गुन्हा कबूल केला. दुसरीही मुलगीच झाल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिस उपनिरीक्षक एम. व्ही. जठार यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून, पाडावे दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे तपास करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत