देवेंद्र फडणवीस करणार उद्धव ठाकरेंचा गौरव!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा गौरव करणार आहेत. तुम्हाला वाटेल की असे कसे काय? पण असे होणार आहे. कारण एक छायाचित्रकार म्हणून उद्धव ठाकरे हे उत्कृष्ट आहेत असे मुख्यमंत्र्यांना मनोमन वाटते. पुरस्कार देण्याची वेळ आलीच तर आपण एक उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून त्यांना पुरस्कार देऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले आहे.

या वृत्तवाहिनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचीही मुलाखत घेतली. त्यावेळी एक प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला की उद्धव ठाकरेंना पुरस्कार द्यायचा झाला तर कोणत्या कारणासाठी द्याल? या प्रश्नानंतर एका क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्री म्हटले की उद्धव ठाकरे हे एक चांगले छायाचित्रकार आहेत. त्यासाठी त्यांचा गौरव करण्यास त्यांना पुरस्कार देण्यास मला नक्की आवडेल. तर उद्धव ठाकरे यांना हाच प्रश्न विचारला असता एक सच्चा मित्र म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुरस्कार द्यायला आवडेल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

या मुलाखतीत या दोघांनीही विचारण्यात आलेल्या खुमासदार प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. उद्धव ठाकरे यांच्यातला कोणता गुण आवडतो असे विचारले असता उद्धव ठाकरे यांच्या ओठात एक पोटात एक नसते असा गुण पाहायला मिळत नाही असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला सच्चेपणा आपल्याला भावतो, सचोटी हा त्यांचा गुण आहे. त्याचमुळे त्यांचे नाव जेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आले होते तेव्हा मी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला होता असेही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

भाजपा आणि शिवसेना यांचे सरकार जेव्हापासून सत्तेत आले तेव्हापासून या दोन्ही पक्षांमधून विस्तव जात नाही. युतीमधली भांडणे, वाद विवाद महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहेत. मात्र भाजपा आणि शिवसेना यांचे हे दोन दिग्गज जेव्हा एकाच व्यासपीठावर आले तेव्हा त्यांनी एकमेकांबाबत गौरवोद्गारच काढले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत